Jalgaon Election Result: जळगावात शिंदे गटाचे आमदार ठरले 'धुरंधर', पण गुलाबराव पाटलांचा बालेकिल्ला ढासळला, नगरपरिषदेत मोठा धक्का
Jalgaon Election Result: जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांना नगरपरिषद निवडणुकीत मोठा धक्का बसलाय.

Jalgaon Election Result: नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकांनी जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरणे हादरवून टाकली आहेत. या निवडणुकांत जिल्ह्यातील अनेक प्रस्थापित नेत्यांना अनपेक्षित धक्के बसले असून, विशेषतः जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यासाठी हा निकाल मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. कारण त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघातील धरणगाव नगर परिषदेत शिवसेना शिंदे गटाचा (Shiv Sena Shinde Faction) उमेदवार पराभूत झाला, त्यामुळे पाटलांचा बालेकिल्लाच ढासळल्याचं चित्र निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील इतर शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी मात्र आपापल्या मतदारसंघात दमदार कामगिरी करत आपले गड कायम राखले आहेत. त्यामुळे गुलाबराव पाटील यांचा पराभव अधिक ठळकपणे चर्चेत आला आहे.
Jalgaon Election Result: जिल्ह्यात इतर आमदारांची दमदार कामगिरी
जळगाव जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी नगर परिषद निवडणुकींत चांगले यश मिळवले. पाचोरा आणि भडगावचे आमदार किशोर पाटील यांनी दोन्ही नगर परिषदांवर भगवा फडकवला. चोपडा येथील आमदार चंद्रकांत पाटील यांनीही शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून आणत आपला प्रभाव सिद्ध केला. पारोळ्याचे आमदार अमोल पाटील यांनीही पारोळा नगर परिषदेत विजय मिळवला.
याशिवाय, अमळनेरमध्ये नुकतेच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले माजी आमदार चौधरी यांनी प्रस्थापित नेत्यांना धक्का देत विजय मिळवला. मुक्ताईनगरमध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांना मागे टाकत बाजी मारल्याचे पाहायला मिळाले.
Gulabrao Patil: गुलाबराव पाटलांना मोठा धक्का
या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील मात्र धरणगाव नगर परिषदेत विजय मिळवण्यात अपयशी ठरले. धरणगाव हे गुलाबराव पाटलांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची होती. धरणगाव नगर परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाकडून वैशाली भावे यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर शिवसेना ठाकरे गटाच्या शहर विकास आघाडीकडून लिलाबाई चौधरी मैदानात होत्या. ही लढत अत्यंत चुरशीची झाली. एकीकडे गुलाबराव पाटील यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली होती, तर दुसरीकडे शहर विकास आघाडीने त्यांचा गड हादरवण्यासाठी पूर्ण ताकद लावली होती.
Jalgaon Election: प्रचारात आरोप-प्रत्यारोप
गुलाबराव पाटील यांनी धरणगावमध्ये अनेक सभा घेत विरोधकांवर जोरदार टीका केली. मात्र, यावेळी त्यांचा राजकीय करिष्मा मतदारांवर प्रभाव टाकू शकला नाही. दुसरीकडे, लिलाबाई चौधरी यांनी अहिराणी भाषेत घेतलेल्या जोरदार सभेमुळे प्रचाराला वेगळी धार दिली. या सभेत त्यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करत केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय ठरलं. "गुलाबराव पाटलांना घातलेले कपडे हे माझ्या नवऱ्याने शोधून दिले होते," असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या आक्रमक शैलीमुळे निवडणुकीत वातावरण तापलं होतं. अखेर निवडणुकीत लिलाबाई चौधरी यांनी बाजी मारली. त्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या बालेकिल्ल्यातच मोठा धक्का बसलाय.
Jalgaon Election: भाजपच्या भूमिकेचीही चर्चा
धरणगाव नगर परिषद निवडणुकीत भाजपने अप्रत्यक्षपणे लिलाबाई चौधरी यांना मदत केल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात आहे. लिलाबाई चौधरी या ठाकरे गटाच्या उमेदवार असल्या, तरी भविष्यात शहर विकासाच्या दृष्टीने त्या भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशीही राजकीय चर्चा सुरू आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा




















