Shahajibapu Patil: 'माझी अजून 35 वर्षे शिल्लक'; सांगोल्यातून शहाजीबापू पाटलांची तुफानी टोलेबाजी, तर मतदारसंघात केलं विशाल शक्ती प्रदर्शन
Shahajibapu Patil: आजवर अनेक मोठ्या नेत्यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्चीमधूनच गेली. मात्र, त्यानंतर महाराष्ट्र शांत होता. या उद्धव ठाकरेंची खुर्ची गेली आणि महाराष्ट्र पेटला असा टोला लगावला आहे.
सांगोला: निवडणुकीच्या शंखनादानंतर आता नेते ॲक्शन मोडमध्ये आल्याचं दिसून येत आहे. काही मतदारसंघात मित्रपक्षांचा विद्यमान आमदारासोबतच मित्रपक्षातील नेते देखील उमेदवारी मागू लागल्याने आता खडाजंगी होऊ लागली आहे. अशातच एका बाजूला शिवसेना (शिंदे गटाचे) आमदार शहाजीबापू यांचे मित्र महायुती सोडून मशाल हाती घेत आहेत. तर दुसऱ्या बाजूला बापू यंदा निवडणूक रिंगणातून माघार घेणार अशी टीका शरद पवार गटाचे दुसरे मित्र करीत असताना बापूनी सांगोल्यात युवक मेळावा घेत विशाल शक्ती प्रदर्शन करून विरोधकांवर तुफानी टोलेबाजी केली.
आपल्या खुमासदार भाषणात संजय राऊत, उद्धव ठाकरे यांच्यासह शेकापच्या नेत्यांवर बापूंनी तोफ डागली. शहाजीबापू यांची सांगोला शहराच्या प्रवेशद्वार पासून युवकांकडून भव्य अशी रॅली काढण्यात आली होती. ठिकठिकाणी जेसीबीने फुलांची उधळण करीत आणि हलग्यांच्या कडकडाटात बापुंना वाजत गाजत युवक मेळाव्याच्या ठिकाणी आणण्यात आले. यावेळी प्रचंड गर्दी होती. शहरात ठिकठिकाणी बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती. यानंतर मेळाव्यात बापूंनी आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी करण्यास सुरुवात केल्यावर युवकांचा तुफानी प्रतिसाद पाहता बापूंची आजही तरुणात मोठी क्रेझ असल्याचे दिसून आले.
लाडकी बहीण योजना आणल्यावर विरोधक कशा रीतीने रोज वेगवेगळ्या शब्दात टीका करीत होते याचा समाचार घेताना लागा खऱ्या बापाचे असल्यासारखे एका शब्दावर ठाम राहा कि असा टोला लगावला. संजय राऊत यांच्यावर शेलक्या शब्दात टोलेबाजी करताना रोज सकाळी दांडकी गोळा करून बडबडत याने महाराष्ट्राला भांबावून सोडण्याचे काम केले असा टोला लगावला. या शहाजी पाटीलने त्याला खासदार व्हायला मत दिले पण तो इतकी वर्षे खासदार आहे. पण एकदा तरी एखादे खासदार निधीचे काम केल्याचे कधी सांगतो का असा टोला त्यांनी लगावला. आता आपल्याबद्दल बोलत नसतो असे सांगताना एकदाच त्याला असे उत्तर दिले आहे कि त्याची बडबड कायमची बंद केल्याचे बापूंनी सांगितले.
आजवर अनेक मोठ्या नेत्यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्चीमधूनच गेली. मात्र, त्यानंतर महाराष्ट्र शांत होता. या उद्धव ठाकरेंची खुर्ची गेली आणि महाराष्ट्र पेटला असा टोला लगावत आता तर त्यांना निशाणीही मशाल मिळाल्याने हे फक्त पेटवापेटवी करीत सुटलेत अशी टीका केली.
मी काय केले हे पाहण्यापेक्षा तुम्ही इतकी वर्षे आमदारकी भोगली तेव्हा तुम्ही काय केले ते सांगा असा टोला लगावला . येथील जनतेला खोटे नाटे सांगण्यापूर्वी मंत्रालयात जाऊन जीआर काढायचे आणि कोणत्या तारखेला जीआर निघाला ते पाहायचे असे सांगत या जनतेला फसवणे बंद करा असा टोला शेकाप व दीपक साळुंखे यांचे नाव न घेता लगावला. मी राजकारण कोणाच्या जीवावर केले नसून येथील तरुण, गरीब, कष्टकरी, मजूर, महिला यांच्या जीवावर आजवर राजकारण केले असे सांगताना दीपक साळुंखे हा गेल्या निवडणुकीत त्याचा अर्ज मागे घेतल्यावर माझ्याकडे आला होता असा टोला लगावला. या अडीच वर्षात 5 हजार कोटीची कामे आणली असून पुढच्या पाच वर्षात सांगोल्यात अजून 5 हजार कोटीची कामे आणून सगळ्याला समाधानी करणार असे सांगितले.
आपण हॉस्पिटलमध्ये असताना कोण कोण काय काय बोलत होते ते मला माहित आहे असे सांगत का माझ्या मरणावर टपला आहे असा टोला विरोधकांना लगावला. माझ्या गुडघ्याची हाडे तुटल्याचे डॉक्टरने सांगितल्यचे सांगत इतकी वर्षे बोकडाची हाडे कडाकडा मोडली मग माझ्या गुडघ्याची हाडे तुटली म्हणून काय झाले असे सांगत जोरदार शेरेबाजी केली. मी 95 वर्षे जगलेल्या गणपतराव देशमुख यांच्या विरोधात 7 निवडणूक लाढलोय त्यामुळे माझी अजून 35 वर्षे शिल्लक आहेत असा टोला विरोधकांना लगावला .