एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
निवडणूक किस्से : रणजितसिंहांच्या भाषणावेळी पवारांनी बैठक थांबवली!
रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपप्रवेश केला, त्यावेळी धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी राष्ट्रवादीची बैठक सुरु होती. शरद पवारांनी मोहिते-पाटलांचं भाषण ऐकण्यासाठी बैठक काही काळ थांबवल्याची चर्चा आहे
मुंबई : राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचा झेंडा हाती घेताना रणजितसिंहांनी केलेलं भाषण ऐकण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी बैठक थांबवल्याचं म्हटलं जातं. मोहिते-पाटलांच्या निर्णयाने पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला सुरुंग लागल्याचं मानलं जात आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार ठरवण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. बैठक सुरु असतानाच मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रणजितसिंहांचा भाजपप्रवेश सुरु होता. या प्रवेशाचं थेट प्रक्षेपण वृत्तवाहिन्यांवर सुरु होतं.
थेट प्रक्षेपण बघताना शरद पवारांनी रणजितसिंह मोहिते-पाटलांनी केलेलं संपूर्ण भाषण ऐकलं. गेल्या 20 वर्ष राष्ट्रवादीत विविधं पदं उपभोगलेले रणजितसिंह आपल्या भाषणात भाजपचे गोडवे गाताना पवार ऐकत होते. भाषण संपल्यावर पुन्हा माढा मतदारसंघाच्या बैठकीला सुरुवात झाली.
काय म्हणाले रणजितसिंह?
विधानपरिषदेमध्ये सदस्य असल्यापासून भाजपबरोबर आपुलकीचं नातं निर्माण झालं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षात राज्य प्रगतीपथावर नेलं. सर्व पक्ष, गटतट बाजूला ठेवत सर्वांची कामे केली. माढा, सोलापूरमधील सिंचन प्रश्न, रेल्वेचे प्रश्न, पासपोर्ट कार्यालयाचे प्रश्नही सोडवले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे विविध रस्त्यांची कामे झाली. राष्ट्रवादीत असून कामे कशी होतात अशी टीकाही त्यावेळी आमच्यावर झाली.
कृष्णा खोरे स्थिरीकरण योजना असा एक प्रकल्प विजयसिंह मोहिते पाटलांनी मांडला होता. मात्र राष्ट्रवादीच्या काळात प्रकल्पाची चेष्टा करण्यात आली. परंतु गेल्या पाच वर्षात या प्रकल्पाला गती मिळत आहे, अशी माहिती रणजितसिंह मोहिते पाटलांनी दिली.
राजकारण हे शेवटच्या माणसाला लाभ देणारे असले पाहिजे. आम्हाला तुमच्याबरोबर काम करण्याची संधी दिली. त्यामुळे आता पुढे तुम्ही सांगाल ते राजकारण, समाजकारण करु, अशी ग्वाही यावेळी रणजितसिंह पाटलांनी दिली.
विजयसिंह पाटलांच्या आशीर्वादने रणजितसिंह भाजपमध्ये : मुख्यमंत्री
आज राजकारणातील एक महत्त्वाचा दिवस आहे. महाराष्ट्राचे राजकारण जे मोहिते-पाटील घराण्याशिवाय पूर्ण होत नाही, ज्यांनी राज्यात ठसा उमटवला, त्याच घराण्यातील तिसरी पिढी रणजितसिंह मोहिते-पाटलांच्या भाजप प्रवेशामुळे मोठं घराणं भाजपसोबत जोडत असल्याच आनंद आहे. माढ्यात खासदार भाजपचाच होईल, असं बोलून रणजितसिंह माढ्याचे लोकसभेचे उमेदवार असतील असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. विजयसिंह मोहिते-पाटलांच्या आशीर्वादने रणजितसिंह भाजपमध्ये आले असल्याचं सांगितलं. तसेच पुढची चर्चा आम्ही विजयसिंह मोहिते पाटलांसोबत करु असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. विजयसिंह तिकडे आहेत की इकडे आहेत यापेक्षा ते मनाने इकडेच आहे, असं सूचक विधान मुख्यमंत्र्यानी केलं.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement