Election Result 2022 : देशाच्या राजकारणात महत्त्वाचं असलेल्या उत्तर प्रदेश या मोठ्या राज्यासह पंजाब (Punjab), गोवा (Goa), उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचा फैसला काही तासातच होणार आहे. या निवडणुकीचे निकाल सर्वात आधी आपल्याला एबीपी माझावर पाहता येणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नवज्योत सिद्धू, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह अनेक दिग्गजांचे भवितव्य आज मतमोजणीत स्पष्ट होणार आहे.
एक्झिट पोलनं उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि मणिपूरमध्ये भाजपची सरशी होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. तर पंजाबमध्ये आम आदमी पक्ष सत्ता मिळवेल असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. उत्तराखंड आणि गोव्यात काट्याची टक्कर आहे आणि तिथं त्रिशंकू स्थितीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एक्झिट पोलनंतर गोव्यात सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसनं भेटीगाठी सुरु केल्या आहेत. यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम गोव्यात तळ ठोकून बसलेत. अशातच आज निकालानंतर पाच राज्यांतील मुख्यमंत्री कोणाचा असेल हे स्पष्ट होईल.
उत्तर प्रदेशात सात टप्प्यात, मणिपूरमध्ये दोन टप्प्यात, गोवा, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये एका टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली आहे. अशातच कोणत्या राज्यात किती टक्के मतदान झालं ते पाहुयात...
उत्तर प्रदेश (Uttar Pradesh)
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 ही प्रामुख्याने तीन मुद्द्यांवर खूप महत्वाची होती. एकतर राम मंदिराचे बांधकाम सुरू झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. त्यानंतर कोरोनाच्या संकटाचा सामना करताना उत्तर प्रदेशात झालेली परिस्थिती आणि शेतकरी आंदोलनाचा परिणाम या निवडणुकीवर पाहायला मिळू शकतो. असं म्हणतात की, दिल्लीच्या सत्तेचा मार्ग हा उत्तर प्रदेशमधूनच जातो. म्हणूनच या निवडणुकीत भाजपनं आपली पूर्ण ताकद लावली होती. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशात अनेक सभा घेतल्या. तर अखिलेश यादव यांनी देखील आपला पूर्ण जोर या निवडणुकीत लावल्याचं दिसलं. मात्र मायावती या निवडणुकीत हव्या तितक्या सक्रिय दिसल्या नाहीत. आता उत्तर प्रदेशात 403 जागांसाठी सातही टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. मतदार राजा कोणाच्या बाजूने निकाल देणार हे 10 मार्चला म्हणजेच, आज कळणार आहे.
कोणत्या टप्यात किती झालं मतदान?
- पहिल्या टप्प्यात 10 फेब्रुवारी रोजी 62.43 टक्के मतदान
- दुसऱ्या टप्प्यात 14 फेब्रुवारी रोजी 64.66 टक्के मतदान
- तिसऱ्या टप्प्यात 20 फेब्रुवारी रोजी 62.28 टक्के मतदान
- चौथ्या टप्प्यात 23 फेब्रुवारी रोजी 62.76 टक्के मतदान
- पाचव्या टप्प्यात 27 फेब्रुवारी रोजी 58.35 टक्के मतदान
- सहाव्या टप्प्यात 3 मार्च रोजी 56.43 टक्के मतदान
- सातव्या टप्प्यात 7 मार्च रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत 46.40 टक्के मतदान
मणिपूर
मणिपूरमध्ये विधानसभेच्या 60 जागांसाठी 28 फेब्रुवारी आणि 5 मार्च अशा दोन टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. या निवणुकीत भाजप आणि काँग्रेस यांच्यात मुख्य लढत आहे. मणिपूरमध्ये पहिल्या टप्प्यात 78.03 टक्के मतदान झाले. तर दुसऱ्या टप्प्यात 78.49 टक्के मतदान झालं.
गोवा
गोव्यात विधानसभेच्या 40 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत भाजपाला आवाहन देण्यासाठी काँग्रेस सोबतच शिवसेना आणि तृणमूल काँग्रेस आपल्या पूर्ण ताकदीने निवडणूक रिंगणात उतरली आहे. गोव्यात एकाच टप्प्यात पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत 75.29 टक्के लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
पंजाबमध्ये 65.32 टक्के मतदान
117 विधानसभा जागांसाठी पंजाबमध्ये एकाच टप्प्यात मतदान पार पडले. मतदारांनी समिश्र प्रतिसाद दर्शवला. पंजाबमध्ये 65.32 टक्के मतदान झाले होते. पंजाबमध्ये अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचार सभा घेतल्या होत्या. अरविंद केजरीवाल, राहुल गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गजांनी प्रचार केला होता.
उत्तराखंड
उत्तराखंडमध्ये एकाच टप्प्यात 70 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. भाजपची सत्ता असलेल्या उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, काँग्रेसचे हरीश रावत आणि आम आदमी पक्षाचे कर्नल (सेनि) अजय कोथियाल यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली गेली आहे. या विधानसभा निवडणुकीत 59.37 टक्के मतदान झाले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- UP Election Result 2022 Live Updates : उत्तर प्रदेशात भाजप सत्ता राखणार? निवडणुकांचे अचूक अपडेट्स फक्त एका क्लिकवर...
- Punjab Election Result 2022 Live : पंजाबमध्ये कोण बाजी मारणार? दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, पाहा निकाल एका क्लिकवर...
- Election Result 2022 LIVE: देशातील सत्तेच्या सेमीफायनलचा आज फैसला, पाच राज्यांचे जलद निकाल पाहण्यासाठी क्लिक करा
- Goa Election Result 2022 Live : भाजप सत्ता कायम राखणार की काँग्रेस सत्तेत येणार? अचूक निकाल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा...
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा