Eknath Shinde : मुंबई नव्हे तर ठाकरेंचं राजकारण धोक्यात, बकासुराच्या तावडीतून मुंबईला सोडवायचं आहे; एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
BMC Election : 20 वर्षापूर्वी कुणासाठी वेगळे झाला होता? आता जनतेने बँड वाजवल्यावर ब्रँडची आठवण झाली असा टोला एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंना लगावला.

मुंबई : निवडणुका आल्यावर ठाकरेंना मराठी माणूस आठवतो, यांचा मराठीचा पुळका खोटा असून यांना फक्त मुंबईच्या तिजोरीचा पुळका आहे अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुंबई धोक्यात नाही तर ठाकरेंचं राजकारण धोक्यात आहे, 16 तारखेनंतर यांचा बँड वाजणार असंही शिंदे म्हणाले. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या प्रचारसभेचा शुभारंभ झाला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली.
आपण अनेक विकास काम करत आहोत. मराठी माणसांना चांगली घरं दिल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या काळात स्पीड ब्रेकर आणि ब्रोकरचं चालत असायचं. आम्ही ते सगळं हटवून टाकलं असं एकनाथ शिंदे म्हणाले. 20 वर्षापूर्वी कुणासाठी वेगळे झाला होता? आता जनतेने बँड वाजवल्यावर ब्रँडची आठवण झाली असा टोला एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंना लगावला.
Eknath Shinde On Thackeray Brothers : मुंबईला लुटण्याचं काम केलं
ठाकरे बंधूंवर टीका करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "काल कोणीतरी व्हिजन डॉक्युमेंट्स दाखवले. इतके वर्षे सत्तेत होता तेव्हा कुठे गेलं होतं व्हिजन? यांनी मुंबईला फक्त लुटण्याचं काम केलं आहे. आजची ही सभा आहे ती मुंबईतल्या भ्रष्टाचाराच्या विरोधातली ललकारी आहे. भ्रष्टाचाराच्या मगरमिठीतून मुंबई आणि मुंबईकरांना सोडवायचं आहे. बकासुराच्या तावडीतून मुंबई सोडवायची आहे."
आम्ही दोघांनी मिळून मुंबईसाठी जे निर्णय घेतले ते तुम्हाला माहीत आहेत. आमच्या काळात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. तुम्ही काय केलं? तुमचा मराठीसाठीचा पुळका खोटा आहे.
तुम्हाला पुळका फक्त मुंबई पालिकेच्या तिजोरीचा आहे. अंडी खाऊन झाली, पण आता कोंबडी कापायला निघाले अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी टीका केली.
Eknath Shinde On Uddhav Thackeray : ठाकरेंचं राजकारण धोक्यात
मुंबई धोक्यात आहे असं म्हणता, पण असं कधीच नव्हतं. तुमचं राजकारण धोक्यात आलं आहे. तीच कॅसेट सुरू आहे. मराठी माणूस आता यांना भुलणार नाही. मुंबई ही मराठी माणसाची आहे, मुंबई ही महाराष्ट्राची आहे. कुणीही 'माई का लाल' आला, सात पिढ्या खाली आल्या तरी मुंबई वेगळी करू शकणार नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे म्हणाले की, "लोकांना आता विकासाचे मारेकरी नकोत, त्यांना आता विकासाचे वारकरी पाहिजेत. दिवसभर नेटफिक्स आणि निवडणुका आल्या की पॉलिटिक्स असं याचं काम आहे. ते कार्यसम्राट नाहीत तर करप्शन सम्राट आहेत. खूप वर्षे मुंबई तुम्ही लुटून खाल्ली. मुंबईकर आता तुम्हाला फसणार नाही. कंत्राट देताना तुम्हाला कधी मराठी माणूस दिसला नाही. मराठी कंत्राटदारांना ब्लॅक लिस्ट करण्याचे काम कोणी केलं? मिठी नदीचा कंत्राट देताना दिनू मोरया दिसला, मराठी माणूस नाही दिसला."
Eknath Shinde On BMC Election : निवडणुका आल्यावर यांना मराठी आठवते
लाडकी बहीण आणि लाडका भाऊ हे महायुतीचा भगवा फडकणार, मुंबईचा महापौर हा मराठीच होणार असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. एकनाथ शिंदे म्हणाले की, "काही लोकांना निवडणुका आल्या की मराठी माणूस आठवतो. पण यांनी मराठी माणसासाठी काय केलं? यांचा म हा मराठीचा नाही, म हा मलिद्याचा आहे. वरुन कीर्तन आणि आतून तमाशा असं आहे. पण आमचा म हा मराठीचा आहे."
त्यांचा किचन सम्राट कोण आहे हे शोधून काढा. जिकडे टेंडर तिकडे सरेंडर अशी त्यांची भूमिका कायम राहिली असा टोला शिंदे यांनी ठाकरेंना लगावला. कोस्टल रोड आम्ही केला असं ते म्हणाले. पण देवेंद्रजींनी सगळ्या परवानगी मिळवल्या म्हणून तो कोस्टल रोड झाला असं शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे म्हणाले की, "सुरवातीला आपण जो विजय मिळवला आहे त्यामुळे समोरच्या लोकाची काय परिस्थिती झाली आहे आपण पाहिली. आता 16 तारखेला विरोधकांचा बँड वाजवून गुलाल उधळायचा आहे. 2025 फक्त ट्रेलर होता, अजून तर पूर्ण पिक्चर बाकी आहे. आमच्या विजयाचं श्रेय हे लाडक्या बहिणी आणि भावांना देतो. ज्या उमेदवाराच्या पाठीशी महिला, त्याचा मतपेटीमध्ये नंबर पाहिला. लाडक्या बहिणींनी विरोधकांचा कार्यक्रम करून टाकला. प्रत्येक निवडणुकीत चांगला पाठिंबा दिला. आपले कार्यकर्ते उत्साहात आहेत. हेच लोक निवडणुका जिंकून देतात. ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आम्ही सर्व कार्यकर्त्यांना निवडून आणणार. ही विजयाची नादी आहे. सुरवात धूमधडाक्यात झाली आहे. राज्यात महायुतीचे 68 नगरसेवक बिनविरोध निवडून आले. इतिहासात हे पहिल्यांदाच घडलं आहे."
ही बातमी वाचा:





















