(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विधानसभा निवडणुकीसाठी चिन्हांचे वाटप, वंचित बहुजन आघाडीचं चिन्ह 'गॅस सिलेंडर'
वंचित बहुजन आघाडीसोबत संभाजी ब्रिगेड पार्टी, महाराष्ट्र क्रांती सेना, हम भारतीय पार्टी, टिपू सुलतान पार्टी, भारतीय जनसम्राट पार्टी या पक्षांनाही चिन्हांचं वाटप करण्यात आलं आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात तिसऱ्या क्रमांकाची मते घेऊनही वंचित बहुजन आघाडीला निवडणूक आयोगाकडून कायमस्वरूपी चिन्ह मिळवण्यात यश मिळालं नव्हतं. वंचित ती कसर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतून भरुन काढणार का? याची उत्सुकता असेल. लोकसभा निवडणुकीमध्ये वंचितचे उमेदवार 'कप-बशी' या चिन्हावर लढले होते.
आता वंचित बहुजन आघाडी विधानसभा निवडणुकीच्या सर्व जागा 'गॅस सिलेंडर' या नव्या चिन्हावर लढणार आहे. त्यामुळे वंचित आघाडी यंदा कुणाला गॅसवर ठेवणार? याचे उत्तर निकालानंतर कळेल.
कायमस्वरूपी चिन्ह मिळाल्यानंतर पक्ष मतदारांपर्यंत पोहोचवणं सोपं जातं, त्यामुळे यावेळच्या विधानसभा निवडणुकीत अधिक मतांची टक्केवारी घेऊन निवडणूक आयोगाच्या पात्रतेत आम्ही नक्की बसू, असा विश्वास प्रकाश आंबेडकर यांनी एबीपी माझाकडे व्यक्त केला. महाराष्ट्र क्रांती सेना या मराठा मोर्चातून स्थापन झालेल्या पक्षाला डायमंड अर्थात 'हिरा' हे निवडणूक चिन्ह मिळालेलं आहे.
कोणत्या पक्षाला कोणतं चिन्ह?
वंचित बहुजन आघाडी - गॅस सिलेंडर संभाजी ब्रिगेड पार्टी - शिलाई मशीन महाराष्ट्र क्रांती सेना - हिरा हम भारतीय पार्टी - ऊस घेतलेला शेतकरी टिपू सुलतान पार्टी - किटली भारतीय जनसम्राट पार्टी - टेलिफोन