देवेंद्र तात्यांनी मला खूप काही शिकवलं; मनोज जरांगेंचं ठरलं, गणित जुळलं, सांगितला विजयाचा फॉर्म्युला
विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल सगळ्यांनी केले आहेत. पण, ज्यांना काढायला सांगितला त्या सगळ्यांनी काढायचे आणि फक्त एकच ठेवायचा.
जालना : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवार द्यायची की नाही, याबाबत मराठा समाजाचे नेते आणि उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानुसार, काही मतदारसंघात उमेदवार देण्यात येणार असल्याची घोषणा जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी केली. त्यामध्ये, दलित, मुस्लीम व मराठा असा विजयाचा फॉर्म्युलाही त्यांनी निश्चित केला आहे. त्यामुळे, 4 नोव्हेंबरपर्यंत राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठीच्या लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, आपण सांगितलेल्या मतदारसंघात एकाच उमेदवाराने (Vidhansabha)आपला अर्ज ठेवायचा आहे, बाकीच्या सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घ्यायचे आहेत, असेही पाटील यांनी म्हटले. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना, देवेंद्र तात्यांकडून मी भरपूर शिकलोय, अशी कोपरखळी देखील पाटील यांनी मारली. मनोज जरांगे पाटील यांनी आज मुस्लीम धर्मगुरू सज्जाद नोमांनी, आनंदराज आंबेडकर यांच्यासह संयुक्त पत्रकार परिषद घेतली, यावेळी ते बोलत होते.
विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल सगळ्यांनी केले आहेत. पण, ज्यांना काढायला सांगितला त्या सगळ्यांनी काढायचे आणि फक्त एकच ठेवायचा. मराठ्यांनी यापुढे आझाद म्हणूनच जगायचं आहे, समाजावर कितीही ददागिरी झाली तरी मागे हटायचं नाही. आम्हाला सरकारने दिलंय काय, धनगर ओबीसी मुस्लिम यांनाही काय दिलंय. तुम्ही 1972 पासून बसवलेले एकही पोल बसवू शकले नाही, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊ शकले नाही, सरकारला दीड हजार रुपये देऊन शेतकरी मारायचे आहेत का, आता सहन करण्याची क्षमता संपली. आता यांचा सुपडा साफ करणार, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकांसाठी शड्डू ठोकला आहे. तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केलीय.
देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल
देवेंद्र तात्यांनी मला खूप काही शिकवलं आहे, तो फार हलक्यात घेतो आम्हाला केव्हाही. मात्र, आता गरिबांची लाट आहे, समाजाने मागे सरकू नये, जनतेचा एकही प्रश्न बाकी ठेवणार नाही, असे म्हणत विधानसभा निवडणुकांसाठी मराठा, दलित व मुस्लीम समाजाने एकत्रित येऊन काम करावे, असे जरांगे पाटील यांनी सूचवले .
विजयाचा जातीय फॉर्म्युला
ज्याचा त्याचा धर्म ज्याच्या त्याच्या जवळ ठेवला पाहिजे. आम्ही हिंदू असूनही आमची गरज फक्त कुटाकुटीसाठी आहे. आरक्षणाला आम्ही सरकारला लागत नाही, आम्ही धर्म परिवर्तन नाही, सत्ता परिवर्तन करण्यासाठी एकत्र आलो आहोत. लिंगायत, बंजारा, धनगर महानुभाव पंथाचे बांधव यांनीही आमच्याकडे यावं, अशी लाट 75 वर्षात आली नाही, अशी लाट पुन्हा पुढंचे 75 वर्ष येणार नाही. आमच्यात शिक्कामोर्तब झाले, जिथे मराठा उमेदवार उभे राहतील तिथे दलित मुस्लिम मतदान करणार, जिथे दलित उमेदवार आहे तिथे मराठा मुस्लिम मतदान करणार आणि जिथे मुस्लिम उमेदवार असेल तिथे मराठा आणि दलितांनी ताकदीनं मतदान करावे, असा विजयाचा फॉर्म्युला मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलाय. तसेच 100 टक्के मतदान करावे, लवकरच आम्ही मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात सभा लावणार आहोत, अशीही घोषणा पाटील यांनी केली.
हेही वाचा
ठाकरेंच्या शिवसेना उमेदवाराची डोकेदुखी वाढली; परभणीतही एकाच नावाचे तीन उमेदवार