Devendra Fadnavis: 'CM शिंदेंनी परवानगी दिली तर मनसेसोबत काही जागांवर युती...', देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis: राज ठाकरे हे आमचे मित्र आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता. पण विधानसभा निवडणुकीत त्यांची भूमिका वेगळी आहे, असंही फडणवीस म्हणालेत.
मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मोठ्या घडामोडी घडत आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी चार तारखेपर्यंतचा अवधी आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी विजय मिळवण्यासाठी नेत्यांच्या भेटीगाठी, विचारविनिमय आणि बंडखोरी रोखण्यासाठीचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. अशातच लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेला जवळपास 110 मतदारसंघांसाठी उमेदवार दिले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून एकीकडे विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली जात आहे. तर दुसरीकडे काही ठिकाणी पेच निर्माण झाल्याचं चित्र आहे. अशातच भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मनसेबरोबर आम्ही एक-दोन जागांवर मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने युती करू शकतो, असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.
नेमकं काय म्हणालेत देवेंद्र फडणवीस?
राज ठाकरे हे आमचे मित्र आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता. पण विधानसभा निवडणुकीत त्यांची भूमिका वेगळी आहे, त्यांनी राज्यभरात अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे ते महायुतीत येतील असा स्कोप देखील नाही. त्यांचे उमेदवार ते परत देखील घेणार नाहीयेत. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत आम्ही समोरा-समोर लढत आहोत. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संमतीने आम्ही एक दोन ठिकाणी त्यांना मदत करणं, किंवा युती करू शकतो. उदाहरणार्थ शिवडीसारखी जागा आहे. ज्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भूमिका घेतली आहे. आम्ही महायुतीमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि छोटे मोठे पक्ष आहेत, विधानसभेत महायुतीचाच विजय होईल आणि महायुतीचा मुख्यमंत्री होईल असा विश्वास देखील देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे.
देवेंद्र फडणवीस काल(गुरुवारी) नागपुरात माध्यमांशी बोलत होते.एकनाथ शिंदेंनी संमती दिल्यानंतर, मनसेला आम्ही तीन, चार जागांवर मदत करू शकतो. उदाहरणार्थ शिवडीच्या जागेवर मुख्यमंत्र्यांनी मदत करण्याची भूमिका घेतली. अशाच काही जागांवर मुख्यमंत्र्याच्या संमतीने युती करता येऊ शकते का मदत करता येऊ शकते का हे पाहता येईल. राज ठाकरे चांगले मित्र आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता. परंतु या निवडणुकीमध्ये त्यांची भूमिका वेगळी आहे, असंही फडणवीस म्हणाले.
माहिम मतदारसंघात ट्विस्ट
माहिम विधानसभा मतदारसंघात मनसेकडून अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर अनेक वर्षांपासून माहिमचे आमदार आहेत. त्यामुळे सदा सरवणकर हे आपला दावा सोडण्यास तयार नाहीत. सरवणकरांना समजावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन्ही दिग्गज नेत्यांनी भेट घेतली, मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण आतापर्यंत त्यांनी माघार घेण्याबाबत नकार दिला आहे. या मतदारसंघात ठाकरेच्या शिवसेनेने देखील उमेदवार दिला आहे. त्यामुळे माहिम मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. पण सदा सरवणकर यांनी अर्ज मागे घेतला तर माहिममध्ये ठाकरे गट विरुद्ध मनसे अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे.