देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या गटनेतेपदी एकमुखाने निवड, दुपारी सत्तास्थापनेचा दावा करणार
Devendra Fadnavis : नव्या सरकार स्थापनेसाठी आज (4 डिसेंबर) मुंबईत राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. आज भाजपाची केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपाची महत्त्वाची बैठक झाली.
Devendra Fadnavis elected as legislature party leader : नव्या सरकार स्थापनेसाठी आज (4 डिसेंबर) मुंबईत राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. आज भाजपाची केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपाची महत्त्वाची बैठक झाली. त्यानंतर भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमुखाने निवड केली. या सर्व निवड प्रक्रियेनंतर आता देवेंद्र फडणवीस (Devenra Fadnavis) हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार हे आता स्पष्ट झाले आहे.
आधी भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक
आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आणि भाजपाचे नेते विजय रूपानी हे केंद्रीय निरीक्षक म्हणून महाराष्ट्रात आले होते. त्यांच्या उपस्थित विधानभवनात भाजपाच्या कोअर कमिटीची ही बैठक झाली. या बैठकीत भाजपाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव एकमताने ठरवण्यात आले. या बैठकीत भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आदी महत्त्वाचे नेते उपस्थित होते.
विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब
ही बैठक संपल्यानंतर विधानसभवनातच भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. या बैठकीला भाजपाचे सर्व 132 आमदार उपस्थित होते. तसेच भाजपाला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांचाही या बैठकीत समावेश होता. भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर भाजपाच्या नेतेपदासाठी शिक्कामोर्तब झाल्यानंतर विधीमंडळ पक्षाच्या बैठकीतही देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव गटनेतेपदासाठी ठेवण्यात आला. या प्रस्तावाला सर्व आमदारांनी एकमताने अनुमोदन दिले.
गटनेतेपदाची निवड नेमकी कशी झाली?
भाजपाच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा विधिमडंळ गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला पंकजा मुंडे यांनी अनुमोदन दिले. यासह प्रवीण दरेकर यांनीदेखील देवेंद्र फडणवीस यांच्या नावाच्या प्रस्तावाला अनुमोदन दिले. मेघना बोर्डीकर यांनीदेखील फडणवीस यांच्या नावाच्या प्रस्तावाला अनुमोदन दिले. योगेश सागर यांनीदेखील भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदासाठी फडणवीस यांच्या नावाच्या प्रस्तावाला अनुमोदन दिले. गोपीचंद पडळकर, आशिष शेलार या नेत्यांनीही फडणवीस यांच्या नावाच्या प्रस्तावाला अनुमोदन दिले.
भाजपाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदासाठी फडणवीस यांच्या रुपात फक्त एकच नाव समोर आल्याने त्यांचीच भाजपाच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली. यावेळी रणधीर सावरकर यांनी विधिमंडळ पक्ष बैठकीचे संचालन केले. फडणवीसांच्या नावाला कोणीही विरोध न केल्यामुळे त्यांची भाजपाच्या गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली.
आता राज्यपालांकडे सत्तास्थापनेसाठी दावा केला जाणार
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. मात्र आता फडणवीस यांची भाजपाच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर फडणवीस हेच मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार, हे आता जवळजवळ स्पष्ट झाले आहे. त्यानंतर आता मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी साडे तीन वाजता सत्तास्थापनेचा दावा केला जाणार आहे. त्यासाठी भाजपाचे गटनेते देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षाचे गटनेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार हे तिघेही राज्यपालांची भेट घेतील. त्यानंतर या भेटीत राज्यात सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांना पत्र दिले जाईल. त्यानंतर सत्तास्थापनेची प्रक्रिया चालू होईल.
गटनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
भाजपा पक्षाच्या विधिमंडळ गटेनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच आगामी काळात दिवसाचे 24 तास महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. आपण पुन्हा एकदा सरकार स्थापन करतो आहोत. आपल्याला फार मोठा जनादेश जनतेने दिलेला आहे. या जनादेशामुळे आनंद आहे. पण आपली जबाबदारीही वाढली आहे. दिलेली आश्वासनं पूर्ण करणं याकडे आपली प्राथमिकता असेल. महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी, सर्व आघाड्यांवर महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी आपल्याला कार्यकरत राहायचे आहे, असे फडणवीस म्हणाले.
तसेच, 2019 सालीदेखील जनतेने आपल्याला कौल दिला होता. हा कौल हिसकावून घेण्यात आला. मला इतिहासात जायचे नाही. कारण आपण आता एक नवी सुरुवात करत आहोत. मात्र 2019 सालानंतर सुरुवातीच्या अडीच वर्षांत आपल्या आमदरांना त्रास देण्यात आला. असे असूनही आपला एकही आमदारा आपल्याला सोडून गेला नाही. त्यामुळेच आज पुन्हा एकदा आपल्या महायुतीला पूर्ण बहुमत मिळाले आहे. भाजपाला 132 जागा मिळाल्या आहेत. हा विजय अभूतपूर्व आहे. मी नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो, अशा भावना फडणवीस यांनी व्यक्त केल्या.
फडणवीसांची गटनेतेपदी निवड होताच शिवसेनेचे उदय सामंत काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी माझ्यावतीने माझ्या पक्षाच्या वतीने मी त्यांचे अभिनंदन करतो. एकनाथ शिंदेंना एकत्र घेऊन विकासाची घोडदौड पुढे चालू राहील. एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की, भाजपचे वरिष्ठ नेते सांगतिल तो निर्णय आम्हाला मान्य असेल. उपमुख्यमंत्री राहून शिंदे यांनी त्यांचे कार्य पुढे सुरू ठेवावं हे आमच्या सर्व आमदाराचं मत आहे. देवेंद्रजी हे प्रकृतीची विचारपूस करण्यास शिंदे यांच्याकडे आले होते. आमचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांनीच करावं ही आमच्या सर्व आमदारांची इच्छा आहे. सरकारमध्ये एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री हे निश्चित झालेले आहे. आम्ही केलेला आग्रह हा महाराष्ट्राच्या हिताचा आहे. शपथविधी कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीच शपथ घेतील. कोणाला कोणते मंत्रिपद मिळणार, मंत्रिमंडळात कोण असेल हा सस्पेन्स राहिलेला बरा. यावर मी बोलणे योग्य नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकनाथ शिंदेंनीबी शपथ घ्यावी ही आमची विनंती आहे.
महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा, पक्षीय बलाबल 2024 (Maharashtra Assembly party wise seats)
महायुती- 237
मविआ- 49
अपक्ष/इतर - 02
---------------------
एकूण - 288
महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा (Maharashtra Partywise seat sharing)
भाजपा- 132
शिवसेना (शिंदे गट)- 57
राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41
काँग्रेस- 16
राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10
शिवसेना (ठाकरे गट)- 20
समाजवादी पार्टी- 2
जन सुराज्य शक्ती- 2
राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी- 1
राष्ट्रीय समाज पक्ष- रासप- 1
एमआयएम- 1 जागा
सीपीआय (एम)- 1
पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इँडिया- पीडब्ल्यूपीआय- 1
राजर्षी शाहू विकास आघाडी- 1
अपक्ष- 2
भाजपाला पाठिंबा देणारे मित्रपक्ष आणि अपक्ष
जनसुराज्य शक्ती - 2
युवा स्वाभिमान -1
रासप- 1
अपक्ष - 1 (शिवाजी पाटील- चंदगड)
भाजपचं एकूण संख्याबळ (BJP MLAs in Maharashtra) 132+5 = 137
हेही वाचा :