Vinod Tawde : विनोद तावडे यांना तात्काळ अटक करा, काँग्रेसची मोठी मागणी, राहुल गांधी यांचा थेट नरेंद्र मोदींना सवाल
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्याकडून पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता. या प्रकरणी काँग्रेसनं मोठी मागणी केली आहे.
मुंबई : विरार येथील विवांता हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, भाजपचे उमेदवार राजन नाईक यांच्याकडून पैशाचं वाटप करण्यात येत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केला होता. हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांनी निवडणूक आयोग आणि पोलिसांनी विनोद तावडेंवर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. या प्रकरणी विनोद तावडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावर राजकीय नेत्याकंडून प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांनी तावडेंच्या अटकेची मागणी केली आहे. तर, राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारला आहे.
महाराष्ट्रात भाजपनं पराभव मान्य केला आहे. यामुळं त्यांनी पैसे वाटप करणं सुरु केलं आहे. भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे पाच कोटी रुपये एका मतदारसंघात जाऊन पैसे वाटणं याचं उदाहरण आहे. कितीही पैसे वाटले तरी भाजप महायुती राज्यात विजय मिळवू शकणार नाही. महाराष्ट्राची जनता सत्तापरिवर्तन करणार आहे.
विनोद तावडे यांनी जे काम केलं आहे त्यासाठी त्यांना अटक केलं पाहिजे. त्यांच्यावर केस चालवली पाहिजे. ज्यांनी पैसे वाटले आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रात भाजप आणि शिंदे गटाकडून पैसे वाटले जात आहेत. त्याची चौकशी केली जावी, असं रमेश चेन्नीथला म्हणाले.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या पैशांवरुन थेट नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला आहे. काँग्रेसच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन विनोद तावडे आणि बविआच्या कार्यकर्त्यांचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओवर कमेंट करत राहुल गांधी यांनी विनोद तावडे प्रकरणी प्रश्न उपस्थित केले आहेत.नरेंद्र मोदीजी हे पाच कोटी कुणाच्या सेफमधून निघाले आहेत. जनतेचे पैसे लुटून कुणाला टेम्पो पाठवला होता, असा सवाल राहुल गांधी यांनी केला.
मोदी जी, यह 5 करोड़ किसके SAFE से निकला है? जनता का पैसा लूटकर आपको किसने Tempo में भेजा? https://t.co/Dl1CzndVvl
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 19, 2024
विनोद तावडे यांची भूमिका काय?
नालासोपारामध्ये उद्या मतदानासंदर्भात आचारसंहितेचं पालन करण्यासंदर्भात एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तिथं येऊन गोंधळ सुरु केला. महायुतीला मिळत असलेल्या पाठिंब्यामुळं विरोधकांकडून निराधार आरोप करत मुद्दा बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. निवडणूक आयोगानं या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करावी असं विनोद तावडे म्हणाले.
इतर बातम्या :