Chitra Wagh VIDEO : संजय राठोड यांच्या प्रचाराला जाणार का? चित्रा वाघ म्हणाल्या, पक्ष सांगेल त्याचा प्रचार करणार
Chitra Wagh On Sanjay Rathod : ठाकरेंच्या तत्कालीन मंत्रिमंडळात असलेल्या संजय राठोड यांच्यावर एका मुलीच्या आत्महत्येला कारणीभूत ठरल्याचा आरोप होता. त्या प्रकरणात चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांचा राजीनामा मागितला होता.
अकोला : यवतमाळमधील एका मुलीच्या आत्महत्येनंतर संजय राठोड यांच्यावर सर्वाधिक टीका केलेल्या चित्रा वाघ यांनी पक्षाने आदेश दिला तर त्यांच्या प्रचाराला जाण्याचे संकेत दिले आहेत. संजय राठोड यांच्या प्रचाराला जाणार का असा प्रश्न विचारल्यानंतर महायुतीच्या उमेदवारांना जिथे जिथे गरज असेल त्या ठिकाणी प्रचाराला जाणार असल्याचं चित्रा वाघ म्हणाल्या. अकोल्यात त्या माध्यमांशी बोलत होत्या.
चित्रा वाघ अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर येथे भाजप उमेदवार हरीश पिंपळे यांच्या प्रचारासाठी आल्या होत्या. त्यावेळी संजय राठोड यांच्या प्रचाराला जाणार का? असा प्रश्न त्यांना विचारला. त्यावर त्या म्हणाल्या की, "आम्ही ही निवडणूक सिरीयस नोटवर घेतली आहे. मी राज्यभर प्रचारासाठी फिरत आहे. त्यामुळे पक्ष पाठवेल, जिथे गरज असेल तिथे प्रचाराला जाणार."
भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी यवतमाळ मुलीच्या आत्महत्या प्रकरणानंतर त्यावेळचे ठाकरेंच्या मंत्रिमंडळातील मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात मोठी मोहीम उघडली होती. पण शिवसेनेच्या फुटीनंतर संजय राठोड यांनी शिंदेंना साथ दिली आणि महायुतीच्या सरकारमध्ये ते मंत्रीही झाले. त्यामुळे त्यांच्यावर टीका करणाऱ्या चित्रा वाघ यांची अनेकदा या मुद्द्यावर पंचाईत झाली होती.
नेमकं प्रकरण काय?
बीड जिल्ह्यातील एका 22 वर्षीय तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी संजय राठोड संशयाच्या भोवऱ्यात सापडले होते. ही तरूणी इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स करण्यासाठी भाऊ आणि मित्रासोबत पुण्याला राहत होती. सोशल मीडियात विशेषत: टिकटॉक अॅपमुळं ती प्रचंड लोकप्रिय झाली होती. 7 फेब्रुवारी 2021 च्या रात्री तिनं पुण्यातील इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर काही दिवसांतच या प्रकरणाशी त्यावेळचे मंत्री संजय राठोड यांचं नाव समोर आलं होतं.
भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणात संजय राठोड यांच्यावर सडकून टीका केली होती. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणीही केली होती.
याचिका मागे घेण्यावरून न्यायालयाने चित्रा वाघ यांना फटकारले
या प्रकरणात चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली होती. मात्र संजय राठोड महायुतीच्या मंत्रिमंडळात सामील झाल्यानंतर राजकारण बदललं. काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी आपल्या वकिलांमार्फत संजय राठोड यांच्याविरोधातील जनहित याचिका मागे घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने चित्रा वाघ यांच्या वकिलाला खडे बोल सुनावले होते.
राजकारण्यांनी जनहित याचिकांच्या माध्यमातून राजकारण करत न्यायालयांना त्यात विनाकारण ओढू नये. बदललेल्या राजकीय स्थितीनुसार तुमची भूमिका बदलते आणि राजकारण करण्यासाठी जनहित याचिकांचा माध्यम म्हणून वापर करून न्यायालयांना त्यात ओढले जात आहे. न्यायालयं हा राजकारण करण्याचा मार्ग नाही, अशा शब्दांत मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठाने फटकारले होते.