Chandrashekhar Bawankule : ''एकनाथ शिंदेची भूमिका 14 कोटी जनतेच्या मनातील भावना''; भाजपची पहिली प्रतिक्रिया, जोरदार स्वागत
एकनाथ शिंदे आज अन् उद्याही आमचे नेते आहेत. त्यांची भूमिका ही महायुती भक्कम करणारी आहे. अशी प्रतिक्रिया देत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहे.
Chandrashekhar Bawankule नागपूर : एकनाथ शिंदे हे महायुतीवर नाराज आहेत, ते भाजपवर नाराज आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वावड्या विरोधकांनी उठवल्या होत्या. एकनाथ शिंदे यांच्यासारख्या अतिशय कणखर आणि कर्तबगार व्यक्ति बद्दल विरोधकांनी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे प्रयत्न केले. मात्र आज एकनाथ शिंदे यांनी महायुतीचे नेते म्हणून जो काही निर्णय घेतला तो अतिशय स्पष्ट असून त्यांनी आपली भूमिका महाराष्ट्राचा जनतेसमोर मांडली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या आजच्या भूमिकेनंतर विरोधी पक्ष नेत्यांच्या ज्या काही तोंडाच्या वाफा सुरू होत्या त्या वाफा या वाफाच राहिल्या आहेत. किंबहूना एकनाथ शिंदे आज अन् उद्याही आमचे नेते आहेत. त्यांची भूमिका ही महायुती भक्कम करणारी आहे. अशी प्रतिक्रिया देत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहे. आज नागपूर येथे प्रेस क्लबला घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि आमचे केंद्रीय नेतृत्व मुख्यमंत्रीपदाबाबत जो काही निर्णय राहील त्याला एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा राहील, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी महायुतीचा नेता म्हणून घेतली आहे. एकनाथ शिंदे यांनी आज जी भूमिका घेतली ती 14 कोटी जनतेची भूमिका आहे. या भूमिकेनंतर विरोधी पक्ष नेत्यांच्या ज्या काही तोंडाच्या वाफा सुरू होत्या त्या वाफा या वाफाच राहिल्या आहेत.असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
महाराष्ट्राच्या विकासासाठी एकनाथ शिंदे यांनी नेहमी काम केले आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी उत्कृष्ट काम केले आहे. समृद्धी महामार्ग तयार करत असताना देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्याला खांदा लावून एकनाथ शिंदे यांनी मंत्री म्हणून काम केलंय. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना धोका दिला, हे एकनाथ शिंदे यांना न पटल्यामुळे हिंदुत्वाची भूमिका घेऊन आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन शिवशाहीचे विचार घेऊन मोठी भूमिका घेतली. पुढे अडीच वर्षाच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या विकासाचे काम केलं. डबल इंजिन सरकारने नेहमीच महाराष्ट्र पुढे नेण्याचं काम केलं. त्यातूनच महायुतीला आज अभूतपूर्व यश मिळाले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचे मी स्वागत करतो आणि त्यांचे आभार मानतो असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.