कुणी पक्ष देतं का पक्ष! जयंत पाटलांची अवस्था नटसम्राट सारखी झालीय, चंद्रकांत पाटलांचा टोला
जयंत पाटील यांची अवस्था सध्या नटसम्राट सारखी झाली आहे. कुणी पक्ष देतं का पक्ष अशी अवस्था जयंत पाटील यांची झाल्याची टीका चंद्रकांत पाटील यानी केली.
Chandrakant Patil on Jayant Patil : भाजपाची अवस्था ही पिंजरा नावाच्या चित्रपटातील मास्तरासारखी झाली आहे. मास्तर तमाशा बंद करायला आले होते पण मास्तराला तमाशाचा नाद इतका लागला की तोच तुणतुणं घेऊन पुढे उभा राहिला’, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी भाजपावर केली आहे. त्यांच्या या टीकेला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. जयंत पाटील यांची अवस्था सध्या नटसम्राट सारखी झाली आहे. कुणी पक्ष देतं का पक्ष अशी अवस्था जयंत पाटील यांची झाल्याची टीका चंद्रकांत पाटील यानी केली.
शब्दाला शब्द जोडून रामदास आठवले होता येत नाही
या महापालिका निवडणुकीत अनेक पक्ष एकत्र दिसत आहेत. ज्या संजय काका आणि विशाल पाटील यांची लोकसभेत कुस्ती झाली तेही या निवडणुकीच्या निमित्ताने गळ्यात गळे घातलेले दिसून येत आहेत असे चंद्रकांत पाटील म्हणाले. शब्दाला शब्द जोडून रामदास आठवले होता येत नाही; भाजपावर केलेल्या पिंजऱ्यातील मास्तर या टिके वरून चंद्रकांत पाटील यांचा जयंत पाटील यांना टोला लगावला. भाजपची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तराप्रमाणे झाली आहे अशी टीका जयंत पाटील यांनी काल जाहीर प्रचार सभेत केली होती. त्यावर प्रत्युत्तर चंद्रकांत पाटील यांनी केले. सांगली महापालिका निवडणुकीत ज्यांनी भाजप पक्षाशी बंडखोरी केली आहे, त्यांच्यावर येत्या 24 तासात कारवाई होईल असेही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
काय म्हणाले होतं जयंत पाटील?
सध्या सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकांदरम्यान, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधील नेत्यांकडून जोरदार आरोप-प्रत्यारोप आणि टीकाटिप्पणी केली जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केंद्रातील आणि राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपावर जोरदार टीका केली आहे. ‘भाजपाची अवस्था ही पिंजरा नावाच्या चित्रपटातील मास्तरासारखी झाली आहे. मास्तर तमाशा बंद करायला आले होते पण मास्तराला तमाशाचा नाद इतका लागला की तोच तुणतुणं घेऊन पुढे उभा राहिला’, अशी टीका जयंत पाटील यांनी भाजपावर केली आहे. भाजपने अकोट येथे एमआयएम आणि अंबरनाथ येथे काँग्रेस पक्षाशी केलेल्या युतीबाबत बोलताना जयंत पाटील यांनी हा टोला लगावला. यावेळी "ये बंद करने आए थे तवायफोके कोठे, मगर सिक्को की खनक सुनकर खुद ही मुजरा कर बैठे..." अशी शेरोशायरी करत जयंत पाटील यांनी भाजपाची खिल्ली उडवली.




















