Markadwadi Voting: शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकरांवर गुन्हा दाखल; मारकडवाडी बॅलेट पेपर मतदान प्रकरणी कारवाई, नेमकं प्रकरण काय?
Markadwadi Voting Stopped: माळशिरच्या मारकडवाडी बॅलेट पेपर मतदान प्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माळशिरस: राज्यासह देशभरात चर्चेत आलेल्या सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा निर्णय घेतला आला होता. त्या मतदानास प्रशासनाचा विरोध दर्शवला होता. गावात कलम 144 लागू करण्यात आले होते. त्यानंतरही मतदान घेणारच असल्याचे उत्तम जानकर (Uttamrao Jankar) यांनी म्हटले होते. मात्र, पोलिस प्रशासनाने एक जरी मतदान झाले तर गुन्हे दाखल करू, असा इशारा दिला होता. त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जानकर (Uttamrao Jankar) यांनी स्थानिकांशी चर्चा करून ही चाचणी प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता माळशिरच्या मारकडवाडी बॅलेट पेपर मतदान प्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकरांवर (Uttamrao Jankar) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदार जानकरांसह (Uttamrao Jankar) शेकडो ग्रामस्थांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मारकडवाडी प्रकरणात पोलिसांकडून आतापर्यंत दोन गुन्हे दाखल करण्यात आलेत. मतदान प्रक्रियेसाठी पुढाकार घेणाऱ्या मारकडवाडीतील 17 जणांसह अन्य 100 ते 200 ग्रामस्थांच्या विरोधात पहिला गुन्हा नोंद करण्यात आला. तर जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार उत्तमराव जानकारांसह 89 ज्ञात आणि 100 ते 200 इतर आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. आमदार उत्तमराव जानकर आणि ग्रामस्थांवर बीएनएस 189 (1), (2), 190, 223 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. माळशिरसच्या नातेपुते पोलीस ठाण्यात सर्व आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएमवरती शंका घेत उत्तम जानकर (Uttamrao Jankar) गटाने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. प्रशासनाने मागणी फेटाळून लावली होती. मात्र, तरी देखील ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची प्रक्रिया सुरू ठेवली होती. पोलिस प्रशासनाने प्रक्रिया थांबवा, अन्यथा गुन्हे दाखल करू, अशी नोटीस देखील दिली होती. दरम्यान, आमदार उत्तम जानकर (Uttamrao Jankar) यांनी ग्रामस्थांची बैठक घेऊन प्रक्रिया मागे घेत कायदेशीर मार्गाने लढा देण्याची भूमिका घेतली होती.