Rajya Sabha Election Result 2022 : राज्यसभा निवडणुकीत भाजपनं अनपेक्षितपणे महाविकास आघाडीला धक्का देत विजयाचा गुलाल उधळला. सुरुवातीपासून भाजपनं राज्यसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात खास टास्क फोर्स नेमली आणि त्याचाच फायदा भाजपला झाला. बारकाईने केलेलं नियोजन आणि मतांची आकडेमोड यातून भाजपला हे यश मिळवता आलं. राज्यसभा निवडणुकीत तिसरी जागा जिंकून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालं आहे. भाजपकडे 113 मतं असताना तिसरा उमेदवार मैदानात उतरवला आणि 123 मतं घेऊन शिवसेनेला धूळ चारली.
राज्यसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या विश्वासू सहकार्यांची एक टास्क फोर्स नेमली आणि मोठ्या चतुराईने विजयश्री खेचून आणला. भाजपनं नेमलेल्या टास्क फोर्समध्ये भाजपचे नेते आशिष शेलार, गिरीश महाजन, प्रसाद लाड आणि आशिष कुलकर्णी यांचा समावेश होता.
आशिष शेलार आणि आशिष कुलकर्णी यांच्या खांद्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मतांची आकडेमोड करण्याची धुरा दिली. पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीची मतं योग्य त्याच पद्धतीनं पडतील याची काळजी घेतली. विरोधकांच्या गोटात काय सुरू आहे यावर शेलार आणि कुलकर्णींची विशेष नजर होती. तीन मतांवर आक्षेप घेऊन महाविकास आघाडीवर दबाव टाकण्यातही शेलार यशस्वी झाले.
गिरीश महाजन आणि प्रसाद लाड यांच्यावर अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या संपर्काची जबाबदारी होती. राज्यसभा निवडणुकीत भाजपला दहा अतिरिक्त मते मिळाली या मतांची जुळवाजुळव करण्यात महाजन आणि प्रसाद लाड यांना यश मिळालं. अपक्ष आणि छोट्या पक्षांना संपर्क करणं, त्यांच्याकडून भाजपलाच मतदान होईल याची खात्री करणं हे मिशन या जोडगोळीला देण्यात आलं होतं.10 अतिरिक्त मतं मिळवून महाजन आणि लाड यांनी हे मिशन फत्ते केलं.
शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ अशी एक म्हण आहे. राज्यसभा निवडणुकीत ही म्हण सत्यात उतरली आहे. महाविकास आघाडीकडे भाजपपेक्षा जास्त संख्याबळ असतानाही ही शक्ती शिवसेनेच्या कामी आली नाही परंतु भाजपचं टीम वर्क आणि देवेंद्र फडणवीस यांच्या युक्तीमुळे शिवसेनेला पराभवाचं तोंड बघावं लागलं.
इतर महत्वाच्या बातम्या
Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस एकसंध; हरयाणा वगळता दोन राज्यात इतरांची फोडली मते
देवेंद्र भुयार म्हणाले, 'संजय राऊत ब्रह्मदेव आहेत का? माझी मुख्यमंत्र्यांवर नाराजी पण...'
'आधी उद्धव साहेबांना विचारा, मग आरोप करा'; संजयमामा शिंदे यांचं संजय राऊत यांना उत्तर