Rajya Sabha Election 2020 : मी घोडेबाजारात आहे का नाही हे सरकार स्थापन होत असताना उद्धव साहेबांना माहित आहे. मंत्रिपद सुद्धा मी नाकारलं होतं. आधी उद्धव साहेबांना विचारुन घ्या आणि मग आरोप करा, असं उत्तर करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना दिलं. राज्यसभा निवडणुकीत संजय राऊत यांनी महाविकास आघाडीला मतं न देणाऱ्यांची नावं जाहीर केली आहेत. यात आमदार संजयमामा शिंदे यांच्यासह सहा आमदारांचा उल्लेख केला. त्यानंतर प्रतिक्रिया देताना संजयमामा शिंदे यांनी संजय राऊत यांचे आरोप फेटाळले.  


"माझ्यावर संजय राऊत यांनी केलेले आरोप धादांत चुकीचे आहेत. मी घोडेबाजारातील आहे का नाही हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहित आहे. सत्ता स्थापनेच्या वेळी मला उद्धव साहेबांनी घरी बोलून काय काय ऑफर दिल्या होत्या, मी काय काय स्वीकारल्या हे विचारुन घ्या आणि मग आरोप करा, असं उत्तर संजयमामा शिंदे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना दिलं आहे. "शिवसेनेचे नेते अनिल देसाई आणि अरविंद सावंत या दोघांबरोबर जाऊन मी मतदान केलं. त्यांनी जो कागद दिला त्यापद्धतीने मतदान केलं. जर घोडेबाजार झाला असेल तर त्यांनी कालच सांगितलं असतं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे मतदान केलं. आघाडी सरकार स्थापन होता मला विमानाने नेलं, मंत्रिपदाची ऑफर दिली ते मी अजून कुठे एक्सपोज केलं नसल्याचंही आमदार संजयमामा शिंदे यांनी सांगितलं. 


संजय राऊत यांच्याकडून सहा आमदारांची नावं उघड
हायव्होल्टेज ड्राम्यानंतर राज्यसभेच्या सहा जागांचा निकाल हाती आला. या निवडणुकीत भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव केला. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत महाविकास आघाडीला मतं न देणाऱ्यांची नावं जाहीर केली आहेत. आमच्या मित्रपक्षांनी आमच्याशी दगाबाजी केली नाही. ज्या कुणी शब्द देऊन दगाबाजी केली त्यांची यादी आमच्याकडे आहे, असं संजय राऊत म्हणाले. काही आमदारांनी शब्द देऊ महाविकास आघाडीला मत दिलं नाही, असं राऊत यांनी सांगितलं. संजय पवार यांना मत न देणाऱ्या सहा आमदारांची नावं संजय राऊत यांनी उघड केली. यामध्ये बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, क्षीतिज ठाकूर आणि राजेश पाटील, करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे, लोह्याचे आमदार श्यामसुंदर शिंदे आणि मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांची नावं संजय राऊत यांनी सांगितली.


संबंधित बातम्या


Sanjay Raut : 'ज्यांनी शब्द देऊन दगाबाजी केली त्यांची यादी आमच्याकडे'; संजय राऊतांनी थेट नावं सांगितली


देवेंद्र भुयार म्हणाले, 'संजय राऊत ब्रह्मदेव आहेत का? माझी मुख्यमंत्र्यांवर नाराजी पण...'