Devendra Bhuyar On Sanjay Raut : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यसभेसाठी शिवसेना उमेदवाराला मतदान न केलेल्यांची यादीच सांगितली. या यादीत अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांचा देखील समावेश आहे. मात्र भुयार यांनी राऊतांचा आरोप फेटाळला आहे. एबीपी माझाशी बोलताना आमदार देवेंद्र भुयार यांनी म्हटलं आहे की, संजय राऊत हे काय ब्रह्मदेव आहेत का? हे ब्रह्मदेवापेक्षा मोठे आहेत असं वाटायला लागलंय. मतदान गोपनीय राहतं, मी दिलं नाही हे यांना कसं माहित. मी महाविकास आघाडीत सुरुवातीपासून आहे हे नंतर आले. किमान समान कार्यक्रम ठरला त्यावेळी मी सोबत होतो, शिवसेना नंतर आली, असं ते म्हणाले. 


आमदार देवेंद्र भुयार यांनी म्हटलं की, मी कुठलाही दगाफटका केलेला नाही. माझी मुख्यमंत्र्यांवर नाराजी आहे पण माझी वयक्तिक नाराजी नाही. माझ्या मतदारसंघातील काही प्रश्न आहेत. आमच्या प्रश्नांसाठी वेळ दिला नाही, त्यावरुन माझी नाराजी नाही.  माझी नाराजी मुख्यमंत्र्यांवर होती जी मी उघडपणे व्यक्त केली, नाराजी उद्धव ठाकरेंपुढे नाही तर काय दाऊद समोर मांडायची का? असा सवाल देखील त्यांनी केला. 


भुयार म्हणाले की, यांच्याकडे पहिल्या पसंतीची मते नव्हती, जी 33 मतं मिळाली ती आमची अपक्षांची होती, ती मतं काही अमेरिकेतून आली नव्हती, असंही ते म्हणाले. त्यांनी सांगितलेल्या सिक्वेंन्सनुसार मी मतदान केलं. मी भाजपकडे कसा जाईल. माझ्या विरोधात उभे असलेले बोंडे तिकडं उभा होते. मी त्यांच्याकडे कसा जाईल, असंही ते म्हणाले. संजय राऊत बेछूट बोलत आहे जे योग्य नाही, याबद्दल मुख्यमंत्री आणि शरद पवारांशी बोलणार आहे, असंही भुयार म्हणाले.


काही आमदारांवर ईडीचं, यंत्रणांचं प्रेशर आहे. त्या दबावात त्यांनी भाजपला मतदान केलं असावं, असं भुयार म्हणाले.  


काय म्हणाले संजय राऊत 
संजय राऊत यांनी बोलताना म्हटलं होतं की, आमच्या मित्रपक्षांनी आमच्याशी दगाबाजी केली नाही. घोडेबाजार उभे होते त्यांची सहा सात मतं आम्हाला मिळाली नाहीत. आम्ही कोणत्या व्यवहारात पडलो नाही. आणि कुठला व्यापार केला नाही. तरीही संजय पवार यांना पहिल्या पसंतीची 33 मतं मिळाली. हा सुद्धा आमचा एक विजय आहे. ज्या कुणी शब्द देऊन दगाबाजी केली त्यांची यादी आमच्याकडे आहे. बहुजन विकास आघाडीचे तीन आमदारांची तीन मतं आम्हाला मिळाली नाहीत. करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे, लोह्याचे आमदार शामसुंदर शिंदे, स्वाभिमानीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी मतं दिली नाहीत, असं संजय राऊत यांनी सांगितलं.