Congress In Rajya Sabha Election : मागील वर्षांपासून काँग्रेसची मते फुटत असल्याचे चित्र दिसत होते. राज्यसभा निवडणुकांसह राज्यांच्या विधानसभेतील विश्वासदर्शक मतांच्या वेळी काँग्रेसची मते फुटली जात असल्याची परिस्थिती होती. मात्र, यंदा नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत अपवाद वगळता काँग्रेसची मते एकसंध असल्याचे दिसून आले. हरयाणामध्ये काँग्रेसचे एक मत फुटले आले. हरयाणामध्ये हा फटका बसला असला तरी काँग्रेसने राजस्थान आणि कर्नाटकमध्ये इतरांची मते फोडली असल्याचे दिसून आले. भारतीय राजकारणात आपल्या अस्तित्वाची लढाई लढत असलेल्या काँग्रेससाठी ही मोठी बाब असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता काँग्रेसने एकजुटीने निवडणुकांना सामोरे गेल्यास यश मिळवता येईल, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केला जात आहे. 


महाराष्ट्रात काँग्रेस उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना काँग्रेस आमदारांची 44 मते मिळाली. या निवडणुकीत काँग्रेसची मते फुटतील अशी जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, निकालानंतर काँग्रेसची मते एकसंध असल्याचे दिसून आले. त्यामुळे काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी यांचा पहिल्याच फेरीत विजय निश्चित झाला. तर, दुसरीकडे कर्नाटकमध्येही भाजप विरुद्ध काँग्रेसमध्ये लढत होती. कर्नाटकमध्ये काँग्रेसचे उमेदवार जयराम रमेश हे रिंगणात होते. कर्नाटकमध्ये ही काँग्रेसने जनता दलाची (सेक्युलर) दोन मते आपल्याकडे वळवली. त्यामुळे जयराम रमेश यांना आपला विजय सुकर करता आला. या ठिकाणीदेखील काँग्रेस पक्षाची व्यूहरचना यशस्वी झाल्याचे दिसून आले. 


राजस्थानमध्ये जादू झाली


राजस्थानमध्ये काँग्रेसला चांगल यश मिळाले. सत्ताधारी असलेल्या काँग्रेसमधील अशोक गहलोत आणि सचिन पायलट गटांनी एकजुटीने ही निवडणूक लढवली होती. सचिन पायलट हे राज्यसभा निवडणुकीच्या दरम्यान पक्षाच्या हायकमांडच्या संपर्कात होते. तर, राज्यातील इतर पक्षातील आमदारांना आपल्याबाजूने वळवण्यासाठी मुख्यमंत्री अशोक गहलोत सक्रिय असल्याचे दिसून आले. राजस्थानमध्ये काँग्रेसने तीन जागांवर विजय मिळवला. राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार रणदीप सुरजेवाला यांना 43 मते, मुकुल वासनिक यांना 42 आणि प्रमोद तिवारी यांना 41 मते मिळाली. तर, भाजपच्या घनश्याम तिवारी यांना 43 मते मिळाली. या निवडणुकीत एका काँग्रेस आमदाराचे मत रद्द करण्यात आले. तर, भाजपच्या आमदार शोभारानी कुशवाहा यांनी क्रॉस वोटिंग करत काँग्रेस उमेदवार प्रमोद तिवारी मत दिले. राजस्थानमध्ये अपक्ष उमेदवार सुभाषचंद्र गोयल यांना पराभवाचा धक्का बसला. त्यांना भाजपचा पाठिंबा होता. 


हरयाणामध्ये फटका


राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये काँग्रेस नेतृत्व सजग असल्याचे दिसून आले. मात्र त्याच वेळी हरयाणामध्ये काँग्रेस नेतृत्वाला हलगर्जीपणा भोवला असल्याचे दिसून आले. पक्षातील गटबाजीचाही फटका बसला. परिणामी अजय माकन यांना निसटत्या पराभवाचा सामना करावा लागला.