Sanjay Raut On Rajya Sabha Election 2022  :   हायव्होल्टेज ड्राम्यानंतर राज्यसभेच्या 6 जागांचा निकाल हाती आला. यावर बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट प्रतिक्रिया देत महाविकास आघाडीला मतं न देणाऱ्यांची नावं जाहीर केली आहेत. आमच्या मित्रपक्षांनी आमच्याशी दगाबाजी केली नाही. घोडेबाजार उभे होते त्यांची सहा सात मतं आम्हाला मिळाली नाहीत. आम्ही कोणत्या व्यवहारात पडलो नाही. आणि कुठला व्यापार केला नाही. तरीही संजय पवार यांना पहिल्या पसंतीची 33 मतं मिळाली. हा सुद्धा आमचा एक विजय आहे. ज्या कुणी शब्द देऊन दगाबाजी केली त्यांची यादी आमच्याकडे आहे. बहुजन विकास आघाडीचे तीन आमदारांची तीन मतं आम्हाला मिळाली नाहीत. करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे, लोह्याचे आमदार शामसुंदर शिंदे, स्वाभिमानीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी मतं दिली नाहीत, असं संजय राऊत यांनी सांगितलं. 


संजय राऊत म्हणाले की, ज्या कारणासाठी सुहास कांदे यांचं मत बाद केलं. त्याच कारणासाठी आम्ही सुधीर मुनगंटीवार यांच्यावर आक्षेप घेतला. मात्र फक्त कांदेंचं मत अवैध ठरवलं. रवि राणा यांनी देखील जे कृत्य होतं त्यांचंही मत अवैध व्हायला हवं होतं, असंही राऊत म्हणाले. इतर मतंही बाद करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, पण तो डाव आम्ही हाणून पाडला असंही राऊत म्हणाले. आम्ही खबरदारी आधीही घेतली होती, आताही घेऊ, फक्त आम्ही घोडेबाजार केला नाही, असं राऊत म्हणाले. 


संजय राऊत म्हणाले की, घोडेबाजारातील घोड्यांमुळं सरकारवर फरक पडणार नाही. फार हरभऱ्याच्या झाडावर चढू नका, हरभरे अपक्षांनी खाल्ले आहेत, असा टोलाही राऊतांनी विरोधकांना लगावला. समोरच्यांनी केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासला. घोडेबाजार जे विकले गेले त्यांची नोंद झाली आहे. काही लोकांनी शब्द देऊन फसवणूक केली. शिवसेनेला कोणताही झटका लागलेला नाही. मात्र हा काही भाजपचा मोठा विजय नाही, असंही ते म्हणाले. आम्ही निसरड्या वाटेवर होतो. ज्या लोकांनी शब्द दिला ते शब्द पाळतील पण त्यांनी ते पाळले नाहीत, असंही ते म्हणाले. 


एका सामान्य कार्यकर्त्याचा पराभव करण्यासाठी भाजपनं पैशांचा पाऊस पाडला


राऊत म्हणाले की, संजय पवार यांच्या पराभवानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील व्यथित झाले आहेत. संजय पवार हे हाडाचे शिवसैनिक आहेत. एका सामान्य कार्यकर्त्याचा पराभव करण्यासाठी भाजपनं पैशांचा पाऊस पाडला. संजय पवार हे उत्तम रित्या लढले. अशा कार्यकर्त्यांची नोंद पक्ष ठेवत असतो, असंही ते म्हणाले. 


संजय राऊत म्हणाले की, विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेच्या दोन जागा निवडून येतील. राष्ट्रवादीच्या दोन जागा निवडून येतील आणि काँग्रेसचा देखील एक उमेदवार निवडून येईल, असं ते म्हणाले.