कोल्हापूर : राज्यसभा निवडणुकीत धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी बाजी मारल्यानंतर जिल्ह्यात राजकीय वनवासात गेलेल्या महाडिक गटाला पुन्हा एकदा बळ मिळाले आहे. ही लोकसभेची रंगीत तालीम आहे असे समजून या निवडणुकीत आम्ही उतरलो, महाडिकांना लढायची सवय आहे, त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, अशा शब्दात माजी आमदार महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik) यांनी धनंजय महाडिक यांच्या विजयानंतर प्रतिक्रिया दिली आहे. महादेवराव महाडिक यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांनाही सूचक इशारा देत राजकारणात लक्ष्मण रेषा मारायला हवी, असा खोचक टोला लगावला आहे. 


माझं नाव महादेव, उद्या मुन्नाची मिरवणूक बघा असे सांगत त्यांनी खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्ह्यात कोणत्या पद्धतीने स्वागत होईल, याचे संकेत दिले. ते म्हणाले की, जिंकणं आणि हरणं यावर महाडिक कुटुंबाचं संकट नाही. ज्यावेळी तो (देव) संकट आणेल त्यावेळी महाडिक संकटात येईल, अन्यथा महाडिकाला कोणी संकटात आणू शकणार नाही. माझं नाव महादेव आहे, नावच परमेश्वराचं आहे, त्याला कोणी धक्का पोहोचू शकत नाही असे ते म्हणाले. 



जे पूर्वी मी पेरलं ते आता उगवत आहे


कोल्हापूर जिल्ह्यानं भरभरुन दिलं आहे, लोक प्रामाणिक आहेत, जनतेनं खूप प्रेम दिलं आहे. राजकारणात वजाबाकी होत असते, पण त्याचे राजकारण केलं नाही. स्वतःचे धंदे सांभाळून राजकारण केलं. मी जे पेरले ते उगवून येत आहे. जनतेनं मला दीर्घायुष्य दिलं आहे, जनतेने मला दिले, मी जनतेला देत राहीन. त्या कामातूनच मी मोठा झालो असल्याचे महाडिक म्हणाले.


लक्ष्मण रेषा मारायला हवी


महादेवराव महाडिक यांनी लक्ष्मण रेषा मारायला हवी असे म्हणत पालकमंत्री सतेज पाटील यांना टोला लगावला आहे. जर लक्ष्मण रेषा ओलांडली आणि सीतामाई गेली तसे राजकारणात होते, माणसाने राजकारण लक्ष्मण रेषा मारली पाहिजे असे महाडिक म्हणाले. जिल्ह्याच्या रणामध्ये महाडिक कायम असणार आहे. जमिनीवर पाय ठेवला म्हणून आपल्याला लढायची सवय आहे. माझ्या दारातून कोण खाली हात रिकामा जाणार नाही, कोणी मला काय म्हणू दे अगर नाही म्हणू दे मी त्याचा विचार करत नाही, चांगल्या भावनेने मी राजकारण करत असतो, चांगले राजकारण असते तेच टिकते, स्वार्थ ठेवून केलेले राजकारण टिकत नाही, असेही ते म्हणाले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या