Ramdas Athawale RPI : महायुतीकडून RPI साठी 2 जागांचा बोनस; समीर वानखेडेंना उमेदवारी?, आठवलेंनी सांगितली खेळी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप अन्य छोट्या पक्षांनाही जागा देण्याची रणनीती आखली जात आहे.
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप अन्य छोट्या पक्षांनाही जागा देण्याची रणनीती आखली जात आहे. भाजपने आपल्या कोट्यातून महाराष्ट्रातील 4 विधानसभा जागा मित्र पक्षांना दिल्या आहेत. ज्या पक्षांना जागा देण्यात आल्या आहेत, त्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आरपीआय (ए) पक्षाचाही समावेश आहे. महाआघाडीत आठवले यांचा पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला 2 जागा देण्यात आल्या आहेत. कलिना विधानसभेची जागा भाजपच्या कोट्यातून आणि धारावी विधानसभेची जागा शिवसेनेच्या कोट्यातून देण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री आणि आरपीआय प्रमुख रामदास आठवले सातत्याने त्यांच्या पक्षाकडे जागांची मागणी करत होते. ते पाच-सहा जागांची मागणी करत होते मात्र भाजपने एक जागा देण्याची घोषणा केली असून शिंदे गटाच्या शिवसेनेने एक जागा देण्याची घोषणा केली आहे. यानंतर मीडियाशी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, मागील 12 वर्षांपासून आम्ही महायुती सोबत आहे. यावेळी आम्ही 21 जागांची यादी दिली होती. त्यात मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जागा होत्या. 8-10 जागा मिळतील अशी अपेक्षा होती, मात्र आम्हाला 2 जागा देण्यात आल्या आहेत.
पुढे रामदास आठवले म्हणाले की, अनेक जागा मागितल्या होत्या, मात्र आमच्याबद्दल सिरीअसली विचार झाला नाही. माझ्याकडे लक्ष अधिक दिलं गेलं नाही. मला माझ्या पार्टीतल्या कार्यकर्त्यांना सांभाळावं लागतं. सोबतच, मला मंत्रीपद, विधान परिषद, महामंडळ आणि संचालक पद देखील देण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलंय. सर्व कार्यकर्त्यांना निवेदन महायुतीचं काम करायचं आहे आणि सरकार आणायचं आहे.
नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोचे माझी झोनल डायरेक्टर IRS अधिकारी समीर वानखेडे शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवतील अशी चर्चा होती. मात्र, मला तसा अजून काही निरोप मिळाला नाही. त्यामुळे धारावीसंदर्भात निर्णय अजून तरी झालेला नाही. समीर वानखेडेंना अडचण असेल तर आमचे सिद्धार्थ कासारे जे मुंबई अध्यक्ष आहेत ते लढू शकतात. कलिना विधानसभेतून अमरजीत सिंह यांना मी उमेदवारी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे, असे आरपीआय प्रमुख रामदास आठवले म्हणाले.
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला होणार मतदान
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची 29 ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे. 288 सदस्यीय महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपने आतापर्यंत 146 उमेदवारांची घोषणा केली आहे. राज्यात 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे, तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत.