Sharad Pawar: मोठी बातमी: लोकसभेच्या निकालापूर्वीच महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, भाजपचा माजी आमदार शरद पवारांच्या भेटीला
Mumbai News: लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी आता अवघे काही तास शिल्लक आहेत. लोकसभेच्या निकालानंतर शरद पवार यांची साथ सोडून गेलेले अनेक नेते परततील, अशी चर्चा आहे. मात्र, आता भाजपचाच बडा नेता शरद पवारांच्या भेटीला पोहोचला आहे.
मुंबई: देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लोकसभेच्या निकालावर राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच बरीच गणिते अवलंबून आहेत. त्यामुळे उद्याच्या निकालानंतर महाराष्ट्रात नवी राजकीय समीकरणे आकाराला येतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, आता लोकसभेचा निकाल (Lok Sabha Election Result 2024) जाहीर होण्यापूर्वीच आमदारकीसाठी इच्छूक असलेल्या नेत्यांनी संबंधित पक्षनेत्यांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे.
लोकसभेच्या निकालापूर्वीच विधानसभेची उमेदवारी निश्चित करण्यासाठी इच्छुक उमेदवारांमध्ये हालचाली सुरू झाली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या महायुतीतील एन्ट्रीमुळे भाजपकडून संभाव्य उमेदवारी मिळणार नसल्याची शक्यता लक्षात घेत माजी आमदारांची शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीशी जवळीक साधायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे उद्गीर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार सुधाकर भालेराव (Sudhakar Bhalerao) यांनी सोमवारी शरद पवार यांची भेट घेतली.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सुधाकर भालेराव हे शरद पवार यांच्या भेटीसाठी आले होते. सध्या उद्गीर विधानसभेत राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे आमदार आहेत. सुधाकर भालेराव आणि शरद पवार यांच्यातील चर्चेचा नेमका तपशील उपलब्ध झालेला नाही. मात्र, महायुतीत सध्याच्या आमदारांनाच पुन्हा विधानसभेची तिकीट मिळण्याची शक्यता लक्षात घेत माजी आमदारांनी पर्यायांची चाचपणी सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर?
काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवळ हे शरद पवार गटात घरवापसी करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारासाठी काही दिवसांपूर्वी तिसगाव येथे सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला नरहरी झिरवळ यांनी अचानक उपस्थिती लावली होती. त्यामुळे झिरवळ शरद पवार गटात परतरणात असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, याबाबत त्यांनी नंतर स्पष्टीकरण दिले होते. झिरवळ हे मंदिराच्या कामासाठी आले होते, योगायोगाने ते बैठकीत सहभागी झाल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
लोकसभा निवडणुकीचा उद्या निकाल
लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये देशात भाजपप्रणित एनडीए आघाडीची सत्ता कायम राहण्याचा अंदाज दिसत असला तरी महाराष्ट्रात धक्कादायक उलटफेर होण्याची शक्यता आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युतीला 41 जागांवर विजय मिळाला होता. मात्र, यंदाच्या निवडणुकीत महायुतीच्या 15 जागा घटण्याची शक्यता आहे. एबीपी- सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला 22 ते 24 आणि महाविकास आघाडीला 23 ते 25 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा
लोकसभेत भाजपला 272 चा आकडा गाठता आला नाहीतर, पाठिंबा देणार का? शरद पवार म्हणाले...