(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Baramati Assembly constituency: अजित पवारांनी पुन्हा विक्रम रचला, लाखाचं लीड कायम, युगेंद्र पवारांचा किती मतांनी पराभव?
Baramati Assembly constituency: एकाच कुटूंबात आणि त्यातल्या त्यात काका-पुतण्या आमने- सामने आल्याने इथे कोण जिंकेल याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागलेलं होतं.
Baramati Assembly constituency: लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीमध्ये देखील बारामती मतदारसंघामध्ये पवार विरूध्द पवार अशी लढत झाली. या बारामती मतदारसंघारडे संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष्य लागलं होतं. या निवडणुकीमध्ये अजित पवारांनी पुन्हा एकदा मोठा विजय मिळवला आहे. अजित पवारांना 196640 तर युगेंद्र पवारांना 80458 इतकी मते मिळाली आहेत. अजित पवार 1,16,182 मतांनी विजयी झाले आहेत. अजित पवारांना गेल्या विधानसभा निवडणुकीत पडलेली तशीच रेकॉर्डब्रेक मते मिळाली आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पाडून महायुतीत सहभागी झालेले अनुभवी अजित पवार (Ajit Pawar) विरुद्ध राजकारणातील नवखे युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांच्यात लढत झाली आहे. युगेंद्र पवार हे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत. तर महायुतीतल राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अजित पवार होते. त्यामुळे एकाच कुटूंबात आणि त्यातल्या त्यात काका-पुतण्या आमने- सामने आल्याने इथे कोण जिंकेल याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागलेलं होतं.
बारामती विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे युवा नेते, अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बारामतीमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांची सांगता सभा पार पडली होती. त्यावेळी बारामतीतील मतदारांना थोरल्या आणि धाकल्या पवारांनी भावनिक साद घालून निवडून देण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, लोकसभेप्रमाणेच ही निवडणूकही भावनिक मुद्द्यावरच फिरणार असल्याच्या चर्चा होत्या.
अजित पवारांनी वेळात वेळ काढून आपला मतदारसंघ पिंजून काढला. प्रत्येक गावामध्ये भेटी देण्याचा, सभा घेण्याचा आणि आपली विकास कामे, योजना तळागाळापर्यंत पोहोचवत अजित पवारांनी मतदारांना साथ देण्याचं आवाहन केलं होतं. त्याचबरोबर आत्तापर्यंत केलेल्या कामांची उजळणी देखील त्यांनी यावेळी केल्याचं दिसून आलं, तर राहिलेली कामे पुर्ण करण्याचं आश्वासन देखील अजित पवारांनी बारामतीकरांना दिलं होतं, लोकसभेला साहेबांना साथ दिली तशी साथ आता विधानसभेला मला द्या, असं देखील त्यांनी म्हटलं होतं. त्यावरून बारामतीकरांनी कोणाच्या पारड्यात विजय टाकला यांच उत्सुकता सर्वांना लागली होती.
2019 मध्ये काय घडलं?
बारामती विधानसभेला 2019 मध्ये अजित पवार यांनी भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा दारुण पराभव केला होता. त्यांनी 1 लाख 95 हजार 641 मते मिळवली होती. पडळकर यांना अवघी 30 हजार 376 मते मिळाली होती. ते 1991 पासून बारामती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. अजित पवार सर्वाधिक वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत.सध्या ते पाचव्यांदा या पदावर आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्यासमोर मताधिक्य राखण्यापासून ते विजयश्री कायम राखण्यापर्यंत संघर्ष करावा लागणार आहे.