Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh Car Attack : काटोलमधील बेलफाट्याजवळ अज्ञात व्यक्तीने अनिल देशमुखांच्या कारवर दगडफेक केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी पोलिस अधिकचा तपास करत आहेत.
नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाली असून त्यांच्या डोक्याला जबर जखम झाली आहे. अनिल देशमुख हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काटोलकडे जात असताना बेलफाट्याजवल अज्ञात व्यक्तीने हा हल्ला केला आहे. हा हल्ला भाजपच्या लोकांनीच केल्याचं अनिल देशमुखांनी म्हटल्याचं व्हिडीओतून समोर आलं आहे.
सोमवारी संध्याकाळी काटोल विधानसभा मतदारसंघामधील नरखेड येथील सांगता सभा आटोपल्यानंतर अनिल देशमुख तीनखेडा भिष्णूर मार्गाने परत येत होते. त्यावेळी काटोल जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गाडीवर दगड फेकला. यात अनिल देशमुख यांच्या वाहनाची समोरची काच फुटली आणि त्याचे तुकडे आतल्या बाजूला उडाले. त्यामुळे अनिल देशमुख जखमी झाल्याचे बोलले जात आहे.
Anil Deshmukh Car Attack : नेमकं काय घडलं?
बेलफाट्यावर आल्यानंतर अनिल देशमुखांच्या गाडीसमोर एक व्यक्ती आला आणि त्याने एक मोठा दगड देशमुखांच्या गाडीच्या समोरच्या काचेवर मारला. त्यामध्ये अनिल देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं.
हा हल्ला झाल्यानंतर अनिल देशमुखांना काटोलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. देशमुखांना झालेली जखम खोलवर झाली नाही असं डॉक्टरांचं म्हणणं नाही. देशमुखांवर सध्या उपचार सुरू आहेत.
हल्ला करणारे हे भाजपचे कार्यकर्ते असल्याचा आरोप यावेळी जखमी झालेले अनिल देशमुख यांनी केल्याचं दिसतंय. ही दगडफेक कोणी केली हे अद्याप स्पष्ट झालं नाही. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
राज्यातील कायदा सुव्यवस्था चिंतेची, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
अनिल देशमुखांवर झालेल्या हल्ल्यानंतर त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असून तो चिंतेचा विषय असल्याचं त्या म्हणाल्या. अनिल देशमुखच नव्हे तर राज्यात कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला होऊ नये असं त्या म्हणाल्या. एका माजी गृहमंत्र्यावर हल्ला होतोय हे दुर्दैवी असल्याचं त्या म्हणाल्या.
दरम्यान, काटोलमधील भाजपच्या स्थानिक नेत्यांनी ही स्टंटबाजी तर नाही ना अशी शंका ही उपस्थित करायला सुरुवात केली आहे. सलील देशमुखांची हार निश्चित असल्याने अनिल देशमुखांनी हा स्टंट केला असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
ही बातमी वाचा: