Andheri East Bypoll 2022 : ऋतुजा लटके उद्या उमेदवारी अर्ज भरतील, कोर्टाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया
Andheri East Bypoll 2022 : शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला.
Andheri East Bypoll 2022 : शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला. शुक्रवारी सकाळी 11 पर्यंत ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने बीएमसीला दिले आहेत. हायकोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर अनिल परब यांनी शुक्रवारी ऋतुजा लटके उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं सांगितलं.
रमेश लटके यांच्या दुर्देवी निधनानंतर शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) त्यांच्या पत्नी ऋतुजा रमेश लटके यांना उमेदवारी दिली होती. पंरतु अतिशय साधं हे प्रकरण होतं. पण ऋतुजा रमेश लटके यांनी निवडणूक लढवू नये, यासाठी शेवटच्या मिनिटांपर्यंत प्रयत्न केले गेले. सगळ्या बाबी क्लिअर होत्या. कायद्यात असणाऱ्या तरतुदी होत्या. त्यांना ज्या तरतुदी लागू होतात. एक महिन्याची नोटीस अथवा एक महिन्याचा पगार.. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची चौकशी नाही. त्याचप्रकारे कोणताही रक्कम त्यांना देय लागत नाही. इतक्या सरळ तरतुदी असनातादेखील आम्हाला हायकोर्टात जावं लागलं, ही दुर्देवी बाब आहे. एखादी विधवा महिला निवडणूका उतरते, तेव्हा तिच्याबाबत सहानभुतीचं धोरण असायला हवं. परंतु ज्या पद्धतीनं अशा पद्धतीची अडकाठी केली. आज दुपारपर्यंत महानगरपालिकेच्या वकिलांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराची केस असल्याचं सांगितलं. अन् ती 12 तारखेला (बुधवार) आली आहे. तीन तारखेला त्यांनी राजीनामा दिलाय, त्या ऑफिसला जात नाहीत आणि 12 तारखेला त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात. म्हणजे किती खालच्या पातळीला जाऊन राजकारण चाललेय, हे आज महाराष्ट्राच्य जनतेनं पाहिलेय. परंतु न्यायदेवतेचे आभार मानतो. आम्हाला न्याय मिळेल, आमचा विश्वास होता. आज न्यायदेवतेनं न्याय दिला आहे, असे अनिल परब यांनी सांगितलं.
रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा रमेश लटके यांचा उद्या (शुक्रवार) सकाळी 11 वाजेपर्यंत राजीनामा मंजूर केला जाईल. उद्या मोठ्या प्रमाणात सर्व कार्यकर्त्यांसह आम्ही ऋतुजा रमेश लटके यांचा उमेदवारी अर्ज भरू, असे अनिल परब यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं.
अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन पहिल्यादिवसांपासूनच केलं आहे. महाराष्ट्रात एक वेगळ्या प्रकारची संस्कृती आहे. पण सध्याचं राजकारण चांगलं चाललेलं नाही. म्हणून आतापर्यंत एखाद्या सदस्याचा मृत्यू झाला अन् तिकडे जर पोटनिवडणूक झाली आणि तिथे जर घरचे कुणी उभं असेल तर आजपर्यंत महाराष्ट्रात निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. त्यांनी मोठं मन दाखवावं अन् ही निवडणूक बिनविरोध करावी. ही निवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्रात अजूनही संस्कृती आहे, हे महाराष्ट्रातील जनतेला दिसेल, असे अनिल परब म्हणाले.
ऋतुजा लटके काय म्हणाल्या?
कोर्टाच्या निकालानंतर ऋतुजा लटके यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहे. मला न्याय देवतेवर विश्वास होता. मला न्याय मिळाला. माझ्या वर आरोप झाले त्याबद्दल माहीत नाही. मला कोर्टात जायची वेळ येऊ द्यायची नव्हती. उद्या फॉर्म भरणार आहे. तसेच उद्धव ठाकरे यांना भेटायला जाणार आहे. नवं चिन्ह आहे ,माणसं जुनी आहेत आणि मला आशीर्वाद आहे रमेश लटकेंचा, असे ऋतुजा लटके म्हणाल्या.