गेल्या महिनाभरातील धावपळीनंतर नेते मंडळी रिलॅक्स मोडमध्ये, निकालाची धाकधूक कायम
निवडणुकांची तारीख जाहीर झाल्यापासून आपल्या मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी जीवाचं रान करणारी नेते मंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते कालपासून थोडे रिलॅक्स झाले आहेत.
मुंबई : गेल्या महिनाभरापासून राज्यात सुरु असलेली लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी काल संपली आहे. प्रचारसभा, भेटी-गाठी, भाषणं, चर्चा-बैठका, आरोप-प्रत्यारोप अशा विविध राजकीय कामांमध्ये राजकीय नेते महिनाभर व्यस्त होते.
निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून आपल्या मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी जीवाचं रान करणारी नेते मंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते कालपासून थोडे रिलॅक्स झाले आहेत. अर्थात निवडणुकीचा निकाल लागणं बाकी असल्यानं थोडी धाकधुक असणार आहेत, मात्र गेल्या महिनाभरातील धावपळीतून थोडा निवांत वेळ त्यांना मिळाला आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांनी गेल्या महिनाभरापासून झटणाऱ्या समर्थक, मतदारांच्या भेटी घेऊन आभार व्यक्त केले. दोन्ही उमेदवारांकडून विजयाचा दावा केला जात आहे. प्रचाराचा थकवा कमी होत असला तरी निकालाची धाकधूक वाढू लागली आहे.
मुंबईतही काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी आज आपल्या कार्यलयात जाऊन लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. एकनाथ गायकवाड यांना कुणी लग्नाचे आमंत्रण दिले, तर कुणी आपल्या समस्या घेऊन त्यांच्याकडे आले होते. लोकसेवा हेच असल्यामुळे लोकांमध्ये राहणंच आवडत असल्याचं एकनाथ गायकवाड यांनी सांगितलं.
काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांनीही आज आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवला. गेले महिनाभर त्यांच्या पत्नीही त्यांच्यासोबत प्रचारात व्यस्त होत्या, त्यांनीही आज अराम केला. संजय निरुपम यांनी आज सकाळी बॅडमिंटन खेळून निवडणुकीतील तणाव घालवला. त्यामुळे 23मेपर्यंत शांत आराम करणार असल्याचं संजय निरुपम यांनी सांगितलं.