ABP C Voter Survey: गुजरातमध्ये राहुल फॅक्टर चालणार? मतदानापूर्वीच्या आठवड्याच्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष काय सांगतो?
Gujarat Assembly Election 2022: सी-व्होटरनं गुजरात विधानसभा निवडणुकीसंदर्भात एबीपी न्यूजसाठी हे साप्ताहिक सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणाचे निष्कर्ष धक्कादायक आहेत.
Gujarat Assembly Election 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अनेक दिवसांपासून सर्वच पक्षांचे नेते व्यस्त आहेत. सर्वच पक्षांनी गुजरातची सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. याच आठवड्याच्या सुरुवातीला राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी गुजरातमधील प्रचाराची धुरा सांभाळली होती. राहुल गांधींनी 21 नोव्हेंबरला गुजरातमधील सूरत आणि राजकोटमध्ये प्रचारसभा घेऊन निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. भारत जोडो यात्रा मध्यंतरी थांबवून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी गुजरातमध्ये पोहोचले होते.
गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून काँग्रेसवर सातत्यानं टिकास्त्र डागलं जात होतं. गुजरात निवडणूक असताना राहुल गांधी दक्षिणेकडील राज्यांमध्ये का फिरत आहेत? ते गुजरातमध्ये कधी येणार? यांसारखे प्रश्न सातत्यानं भाजप नेत्यांकडून विचारले जात होते. मात्र, या सर्व चर्चांना पूर्णविराम देत राहुल गांधींनी गुजरातमध्ये प्रचारासाठी हजेरी लावली. त्यांनी सभा घेतली आणि भाजपसह नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर जोरदार निशाणा साधला. अशातच अनेक प्रश्न चर्चेत आहेत, ते म्हणजे, राहुल गांधींच्या सभेमुळे गुजरातचं वातावरण बदलेल का? की, राहुल गांधींनी गुजरातमध्ये प्रचारासाठी फारच उशीर केला? या सर्व प्रश्नांची उत्तरं एबीपी न्यूज-सी व्होटरच्या सर्वेक्षणातून समोर आली आहेत.
गुजरात निवडणुकीसंदर्भाती शेवटच्या आठवड्यातील सर्वेक्षण
सी-व्होटरनं गुजरातमधील लोकांचा मूड जाणून घेण्यासाठी एबीपी न्यूजसाठी साप्ताहिक सर्वेक्षण केलं आहे. हे शेवटचं साप्ताहिक सर्वेक्षण आहे कारण, गुजरातमध्ये 1 डिसेंबरला पहिल्या टप्प्यातील निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यात सौराष्ट्रातील 54 आणि दक्षिण गुजरातमधील 35 जागांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी 29 नोव्हेंबरला प्रचाराच्या तोफा थंडावणार आहे. या सर्वेक्षणात 1 हजार 889 लोकांची मतं घेण्यात आली आहेत. बुधवार ते शुक्रवार या कालावधीत हे सर्वेक्षण करण्यात आलं आहे. सर्वेक्षणात मार्जिन ऑफ एरर प्लस मायनस 3 पासून प्लस मायनस 5 टक्के आहे.
गुजरातमध्ये राहुल अपयशी?
सी-व्होटरनं सर्वेक्षणात प्रश्न विचारला की, राहुल गांधींच्या प्रचारामुळे गुजरातचे वारे बदलणार का? या प्रश्नाचे अत्यंत आश्चर्यकारक निष्कर्ष सर्वेक्षणातून समोर आले आहेत. सर्वेक्षणात 41 टक्के लोकांनी होय, राहुल यांच्या प्रचारामुळे गुजरातचे वातावरण बदलणार असल्याचं सांगितलं. तर राहुलच्या प्रचारानं गुजरातचे वारे बदलणार नाहीत, असं 59 टक्के लोकांचे मत आहे.
राहुल गांधींच्या प्रचारामुळे गुजरातच्या जनतेचा कौल बदलणार?
स्रोत : सी व्होटर
हा : 41 टक्के
नाही : 59 टक्के
टीप: सी-व्होटरनं एबीपी न्यूजसाठी हे सर्वेक्षण केलं आहे. सर्वेक्षणाचे निकाल पूर्णपणे लोकांशी झालेल्या संवादावर आणि त्यांनी व्यक्त केलेल्या मतांवर आधारित आहेत. याला एबीपी न्यूज जबाबदार नाही.