Pune : पुण्यात भटक्या कुत्र्यांना खाद्य देणाऱ्या महिलेस मारहाण; महिला पोलिसाविरोधात गुन्हा दाखल
Pune Police : भटक्या कुत्र्यांना खाद्य देणाऱ्या एका महिलेला महिला पोलिसांनी मारहाण केल्याची घटना पुण्यात घडली आहे.
पुणे : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका उद्योजकाला आपले प्राण गमवावे लागले असल्याची घटना अहमदाबादमध्ये घडली. त्यानंतर भटक्या कुत्र्यांविरोधात (Stray Dogs) संताप व्यक्त केला जात आहे. पुण्यात भटक्या कुत्र्यांना खाद्य देणाऱ्या महिलेस मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने ही मारहाण केली आहे. तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भटक्या कुत्र्यांचा मुद्दा मागील काही दिवसांपासून ऐरणीवर आला आहे. अनेकांकडून भटक्या श्वानांना जेरबंद करण्याची मागणी करण्यात येत आहे. तर, दुसरीकडे श्वानप्रेमींकडून याला विरोध केला जात आहे. मागील काही काळात विविध ठिकाणी भटक्या श्वानांनी लहान मुलांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. त्यातच आज भटक्या श्वानांना खाद्यपदार्थ देणाऱ्या महिलेला मारहाण केल्याचा प्रकार घडला. पुण्यातील डीएसके विश्व येथील चंद्रमा सोसायटी परिसरात ही धक्कादायक घटना घडली. भटक्या श्वानांना खाद्य का देते, यावरून महिला पोलिस कर्मचाऱ्याने महिलेस मारहाण केली. या महिला पोलिसाने भटक्या श्वानांसाठी असलेले खाद्य फेकून दिले. पुण्यातील डीएसके विश्व येथील चंद्रमा सोसायटी परिसरात घडला. मनिषा पवार असे या महिलेचे नाव आहे.
मनेका गांधींनी घेतली दखल
या मारहाण प्रकरणी महिला पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मोहिनी पैठणकर कुलकर्णी असे या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांच्याविरोधात पुणे ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भटक्या श्वानांना खाद्यासाठी भटकंती करताना अपघात होतात आणि निष्पाप जीव जातो. या मुक्या प्राण्यांना खाद्य पुरविण्याचे काम गेल्या मनिषा पवार अनेक वर्षांपासून करतात. एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने श्वानांसाठी आणलेले खाद्य फेकून दिले. माजी मंत्री मनेका गांधी यांनी पोलिस आयुक्तांशी संपर्क साधला. गांधी यांनी विषयात लक्ष घालण्याची मागणी आयुक्तांकडे केली. याबाबत पवार यांनी पशुसंवर्धन तक्रार विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर झालेल्या मारहाणी विरोधात हवेली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. त्यावरून पैठणकर- कुलकर्णी यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
सोलापुरात पिट बुल श्वानाचा हल्ला
काही दिवसांपूर्वी सोलापूरमधील एमआयडीसी परिसरात असलेल्या लक्ष्मीनारायण टॉकीज समोर असलेल्या एका व्यावसायिकने पिट बुल प्रजातीचे कुत्रा पाळला आहे. यावेळी, आसिफ मुल्ला हा कंपाउंडच्या आत गेल्यानंतर पिट बुलने त्याच्यावर हल्ला चढवला. तर, हल्ला करणाऱ्या या कुत्र्याने आसिफ याच्या अंगाचे अक्षरशः लचके तोडलेत. कुत्र्याच्या हल्ल्यात आसिफ गंभीर जखमी असताना ही उपस्थितपैकी कोणीही कंपाउंडच्या आत जाऊन त्याला वाचवण्याची हिंमत दाखवू शकला नाही. मात्र, आसिफ स्वतःला वाचवण्यासाठी धडपड करत होता. काही वेळानंतर आसिफ यास शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पिट बुल प्रजातीच्या श्वान पाळण्यासाठी जगातील अनेक देशात बंदी आहे. देशात देखील उत्तरप्रदेश आणि दिल्ली सारख्या राज्यात पिट बुल पाळण्यावर बंदी आहे.