Wardha : 'ठाकरे किचन'मध्ये हरणाच्या मटणावर ताव, बिल्डरांचाही समावेश असल्याची चर्चा, आठ जणांवर गुन्हा दाखल
Wardha Crime : वर्ध्याच्या आंजी परिसरातून हरणाची शिकार केल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. त्यानंतर सांगवीच्या हॉटेलवर धाड टाकून वनविभागाने कारवाई केली.
वर्धा: हरणाची शिकार (Wardha Deer Hunting) करून हॉटेलात पार्टी करणाऱ्यांना ही पार्टी चांगलीच भोवल्याचं दिसून आलं. वर्ध्याच्या सावंगी येथील 'ठाकरे किचन' मध्ये ही हरिणाच्या मटणाची पार्टी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी वन विभागाने (Forest Department) दोघांना ताब्यात घेतलं आहे तर आठ जणांवर गुन्हा दाखल (Wardha Crime) केला. या पार्टीमध्ये जिल्ह्यातील काही बिल्डरांचा समावेश असल्याची चर्चा आहे.
वन विभागाने हरणाची शिकार करून पार्टी करणाऱ्या आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना वनविभागाने ताब्यात घेतले आहे. हरणाच्या पार्टीमध्ये शहरातील बिल्डरांचा देखील समावेश असल्याची वनविभागात चर्चा रंगली आहे. हरणाच्या शिकारीचा मुख्य आरोपी फरार असल्याचे सांगितले जात आहे.
वर्ध्याच्या आंजी परिसरातून हरणाची शिकार करण्यात आल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. सावंगीच्या टी पॉईंट चौकातील 'ठाकरे किचन' या हॉटेलमध्ये हरणाच्या मटणाची पार्टी झाल्याचं तपासात पुढे आले आहे. आंजी येथे राहणारा अर्जुन सिंग हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. वन विभागाने या प्रकरणाचा तपास सुरू केला असून हरणाच्या मटणावर ताव मारणाऱ्या आरोपींची संख्या वाढण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
धाराशिवमध्ये बिबट्या गायब
धाराशिव तालुक्यात बिबट्याच्या शोधात वन कर्मचाऱ्यांची रानोमाळ भटकंती सुरू झाली आहे. शहराच्या सात किलोमीटर परिसरातील बागा, शेतशिवाराची कसून पाहणी करण्यात येतेय. तर वनविभागाच्या 20 जणांचे पथक या बिबट्याचा शोध घेत फिरत आहे. तुळजापूरच्या श्रीतुळजाभवानी मंदिराच्या पायथ्याशी सिंदफळ शिवारात बिबट्याच्या वावर असल्याचा चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु आहेत. त्यामुळे वनविभाग अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे.
वनविभागाच्या वीस जणांच्या पथकाने सिंदफळ परिसरात तब्बल सात किलोमीटरच्या परिसरातील फळ बागा, शेतामध्ये बिबट्याच्या शोधार्थ मोहीम राबवली. पण वनविभागाच्या हातात ना बिबट्या लागला, ना बिबट्याच्या काही खानाखुणा. दोन रात्री या भागातील शेतकऱ्यांनी शेतात जाणे टाळले तर ग्रामस्थांनी अख्खी रात्र जागून काढली. पण तरीही या बिबट्याचा काही मागोवा लागला नाही.
धाराशिव तालुक्यातील वरंवटी येथून बिबट्या आढळल्याच्या चर्चेला सुरूवात झाली. त्यानंतर कामठा, आपसिंगा आणि आता सिंदफळ असा हा डोंगर, दाट वनराई भागात प्रामुख्याने बिबट्याचा वावर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याचवेळी वरवंटी येथे एका वासराचा तर आपसिंगा शिवारात एका शेळीचा भरदिवसा फडशा फाडल्याचे फोटे व्हायरल झाले. त्यामुळे बिबट्याचा वावर असण्याच्या शक्यतेवर ग्रामस्थांचा विश्वास दृढ होत गेला.
ही बातमी वाचा: