वसईच्या सेंट जोसेफ सहकारी बँक घोटाळ्यातील व्हॅलेरियन घोन्साल्वीसला सात महिन्यानंतर अटक, पीटर फर्नांडिस अद्याप फरार
Vasai St Joseph Cooperative Bank Scam: सेंट जोसेफ को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा आर्थिक घोटाळा हा जवळपास 20 कोटीचा असून यातील एक आरोपी अद्याप फरार आहे.
Vasai Crime: वसईत गाजलेल्या सेंट जोसेफ को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत सोसायटीचा माजी अध्यक्ष व्हॅलेरियन घोन्साल्वीस याला अखेर सात महिन्यानंतर अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. यापूर्वी एकाला पोलिसांनी अटक केली होती. तर माजी जनरल मॅनेजर पीटर फर्नांडिस हा अद्याप फरार आहे. या आरोपींनी मागील पंधरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये दिली गेलेली बोगस कर्जाप्रकरणी भागधारकांनी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. सेंट जोसेफ को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा आर्थिक घोटाळा हा जवळपास 20 कोटीचा असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
वसईच्या सेंट जोसेफ को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा माजी अध्यक्ष व्हॅलेरियन घोन्साल्वीस, माजी जनरल मॅनेजर पीटर फर्नांडिस, सैय्यद अहमद शेख आणि अन्य साथीदारांनी थ्री एसएफ ऑटो पार्टनरशीप फर्मच्या भागीदारांसोबत संगनमत करून सेंट जोसेफ क्रेडिट सोसायटीत कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला. यानंतर वसई पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणी वसई न्यायालयाने तसेच मुंबई उच्च न्यायालयानेही आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज रद्द केले होते. तसेच जामीन अर्जही फेटाळले होते. मात्र मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात मिळत नसल्यामुळे सदर प्रकरणाचा तपास गेली अनेक महिने रखडला होता.
वसई पोलिसांनी या प्रकरणातील एक आरोपी सैय्यद अहमद शेख याच्या मुसक्या या आधीच आवळल्या होत्या. मात्र त्याला वसई न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मात्र अन्य दोन आरोपींना अद्याप अटक न झाल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभं राहत होता. अखेर सात महिन्यानंतर मुख्य आरोपी व्हॅलेरियन घोन्साल्वीस याला शुक्रवारी रात्री 8.30 वाजता वसई पोलिसांनी अटक केली. त्याला आज शनिवारी वसई न्यायालयात हजर केलं असता वसई न्यायालयानं पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर पीटर फर्नांडीस हा आरोपी अद्याप फरार असून, पोलिसांना अजून सापडलेला नाही.
सोसायटीचा माजी अध्यक्ष व्हॅलेरियन घोन्साल्वीस, माजी जनरल मॅनेजर पीटर फर्नांडिस, सैय्यद अहमद शेख आणि अन्य साथीदारांनी या संस्थेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. आता माजी अध्यक्षाला अटक झाल्यानंतर कोट्यवधी रुपयांचा अपहार नेमका कसा झाला याच्यावर प्रकाश पडणार आहे. माजी अध्यक्ष व्हॅलेरियन घोन्साल्वीस याच्या मागील पंधरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये, दिली गेलेली बोगस वाहन कर्ज, बोगस गहाण कर्ज प्रकरणांची चौकशी पूर्ण करण्याची मागणी वकिलांनी केली आहे.
ही बातमी वाचा: