Vasai Crime News: तीन वर्षांत 200 हून अधिक पुरुषांनी केला अत्याचार; आतापर्यंत 12 जणांना अटक, वसईत नेमकं काय घडलं?
Vasai Crime News: वसईतील नायगाव येथे 26 जुलै रोजी उघडकीस आलेल्या देह व्यापार रॅकेटमधून 12 वर्षीय बांगलादेशी मुलीची सुटका करण्यात आली होती.

Vasai Crime News वसई: अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने एनजीओच्या मदतीने 12 वर्षीय बांगलादेशी मुलीची वसईच्या नायगांव येथून देहव्यापारातून सुटका केली होती. तीन वर्षात 200 हून अधिक पुरुषांनी अत्याचार केल्याचा धक्कादायक खुलासा झाला. या प्रकरणी आतापर्यंत 12 जणांना अटक झाली असून, सहा आरोपी (Vasai Crime News) बांगलादेशातील आहेत. पीडिता बाल कल्याण समितीच्या ताब्यात आहे. पीडित 12 वर्षीय मुलीवर कशा प्रकारे अत्याचार झाले? या घटनेचा भांडाफोड कसा झाला? याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त मदन बल्लाळ यांनी एबीपी माझाशी बोलताना माहिती दिली आहे.
पोलिसांनी काय सांगितलं?
दिनांक 26 जुलै रोजी नायगाव येथे बांगलादेशच्या अल्पवयीन मुलीची सुटका केली. या मुलीला देह व्यापाराला लावून 3 जण पैसे कमावत होते. या तीन जणांना अटक करण्यात आली आहे. सदर पीडित अल्पवयीन मुलीला परिक्षेत नापास झाल्यामुळे जबरदस्तीने भारतात आणलं. त्यानंतर तिला देह व्यापारात ढकलण्यात आले. पीडितेने विरोध केला असताना दलालांनी गरम चमच्याने चटके दिले. तसेच गुंगीचे औषध देखील देण्यात आले होते. तसेच आणखी एका 21 वर्षीय मुलीची देखील सुटका करण्यात आली आहे. मुलींकडून जे जे नावं पुढे येतील, त्यांना सर्वांना अटक करण्यात येईल, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त मदन बल्लाळ यांनी दिली.
नेमकं प्रकरण काय? (Vasai Crime News)
वसईतील नायगाव येथे 26 जुलै रोजी उघडकीस आलेल्या देह व्यापार रॅकेटमधून 12 वर्षीय बांगलादेशी मुलीची सुटका करण्यात आली होती. केवळ तीन महिन्यांत 200 हून अधिक पुरुषांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे पीडित मुलीने म्हटले आहे. शालेय परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यानंतर, अल्पवयीन मुलीला तिच्या गावातील एका महिलेने आमिष दाखवून तिला पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे बेकायदेशीरपणे आणले आणि तिची बनावट कागदपत्रे बनवली होती. त्यानंतर तिला मुंबईला नेण्यात आले, जिथे तिला नायगावमध्ये बंदिवान बनवण्यात आले.
संमतीशिवाय अनेक अज्ञात ग्राहकांना ऑफर-
नायगावमध्ये ती एका वृद्ध पुरूष आणि त्याच्या पत्नीसह 7 ते 8 मुलींसोबत राहिली होती. त्या पुरूषाने तिला इंजेक्शन दिले आणि तिच्यावर अत्याचार केला आणि तेव्हापासून तिला तिच्या संमतीशिवाय अनेक अज्ञात ग्राहकांना ऑफर करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली. तपासात उघड झाले की, शाळेत एका विषयात नापास झाल्यानंतर पालकांच्या भीतीने मुलगी ओळखीच्या एका महिलेसोबत घरातून पळाली होती. मात्र त्या महिलेने तिला भारतात आणून देह व्यापारात ढकलले. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
























