Vaibhav Chavan Death Case Beed Crime News: बोगस खेळाडूंचे रॅकेट उघडकीस आणणार्या वैभव चव्हाणचा मृतदेह आढळल्याने खळबळ; अंगावर मारहाणीच्या जखमा, बीडमधील घटना
Vaibhav Chavan Death Case Beed Crime News: बीडच्या नवगण राजुरी येथील वैभव चव्हाण या युवकाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Vaibhav Chavan Death Case Beed Crime News: खेळाडू असल्याचे बोगस प्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळवणार्यांचे रॅकेट उघडकीस आणणार्या नवगण राजुरी येथील वैभव चव्हाण या युवकाचा मृतदेह (Vaibhav Chavan Death Case) आढळून आला. इमामपुर शिवारात गुरुवारी हा मृतदेह आढळल्यानंतर नातेवाईकांनी घातपाताचा आरोप करत सखोल चौकशीची मागणी केली आहे.
बीड तालुक्यातील नवगण राजुरी येथील वैभव चव्हाण हा दोन वर्षांपूर्वी धाराशिव येथे पोलीस दलात भरती झाला होता, परंतु त्याच्याएव्हढेच गुण असणार्या दुसर्या उमेदवाराने खेळाडू असल्याचे प्रमाणपत्र सादर केल्याने चव्हाण याची संधी हुकली होती. यानंतर चव्हाण याने या सर्व प्रकाराचा पाठपुरावा करत बोगस प्रमाणपत्राचे रॅकेट समोर आणले होते. त्यामुळे राज्यातील 14 पोलिस कर्मचार्यांसह काही क्रीडा अधिकारीही निलंबित झाले होते. त्यानंतर बनावट प्रमाणपत्र देणार्या कुराश असोसिएशनच्या अध्यक्ष, सचिवांना पुणे गुन्हे शाखेने सप्टेंबर 2026 मध्ये अटक केली होती.तेव्हापासून वैभव चव्हाण याला जीव मारण्याच्या धमक्या येत होत्या. त्याने यापूर्वी रेकॉर्डिंग करून त्याच्या मित्राला पाठवल्या होत्या की माझा मृत्यू कशाही पध्दतीने झाला तरी याला कुराश संघटना जबाबदार असेल. गुरुवारी वैभवचा बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत इमामपुर हद्दीत एका लिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. (Beed Crime News)
वैभव चव्हाणचा इमामपुर शिवारात आढळला मृतदेह- (Vaibhav Chavan Death Case Beed)
वैभव चव्हाण याचा इमामपुर शिवारात मृतदेह आढळून आला. यानंतर त्याचे शवविच्छेदन करतांना त्याच्या अंगावर मारहाण केल्याच्या तसेच पायाला जखमा असल्याचे आढळून आले आहे. दरम्यान, हा सर्व घातपाताचा प्रकार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे, तसेच गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी बारा तास ठिय्या आंदोलन देखील करण्यात आले. यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी नातेवाईकांशी समजूत घालत शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्याप्रमाणे गुन्हा दाखल करु असे आश्वासन दिल्यानंतर वैभव चव्हाण याच्यावर रात्री उशीरा नवगण राजुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
वैभव चव्हाण कराटे स्पर्धेचा उत्कृष्ठ खेळाडू- (Vaibhav Chavan Death Case)
वैभव चव्हाण कराटे स्पर्धेचा उत्कृष्ठ खेळाडू असल्याने त्याच्याकडे राज्य, राष्ट्रीयस्तरावचे प्रमाणपत्र होते. 2024-25 मध्ये त्याने धाराशिव पोलीस भरतीमध्ये खेळाडू कोट्यातून अर्ज केला होता. वेटिंग लिस्टमध्ये असतांना त्याच्या पुढच्या उमेदवाराने बोगस प्रमाणपत्र काढत नोकरीला लागला होता. या प्रकरणी त्याने क्रीडा आयुक्तालय बालेवाडी, पुणे येथे तक्रार केली होती. या तक्रारीवरून बोगस प्रमाणपत्र देणारे मोठे रॅकेट बाहेर आले होते. कुराश असोसिएशनच्या अध्यक्ष, सचिवांसह त्या-त्या जिल्हाध्यक्षांवर गुन्हे दाखल झाले होते.तेव्हापासून वैभव चव्हाणच्या जीवितास धोका असल्याचे तो म्हणत होता. त्यामुळे त्याने माझ्या आणि माझ्या मित्राच्या जीवितास धोका असल्याचे म्हटले होते. तशा रेकॉर्डिंग व्हायरल झालेल्या आहेत.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
संबंधित बातमी:





















