(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुलाला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देतो सांगत भामट्यांकडून शिक्षकाची 10 लाखांना फसवणूक
नांदेडमधील विजयनगर भागातील एका शिक्षकाला वैद्यकीय महाविद्यालयात मुलाला प्रवेश देतो असं सांगत त्याची 10 लाखांना ऑनलाईन फसवणूक केली आहे.
नांदेड : विजयनगर भागातील एका शिक्षकाला 10 लाख रुपयांचा गंडा घातला आहे. वैद्यकीय महाविद्यालयात मुलाला प्रवेश देतो, असं सांगत भावट्यांनी शिक्षकाची 10 लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली आहे. यासंदर्भात शिवाजीनगर पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.
विजयनगरमध्ये राहणाारे शिक्षक दत्ता लक्ष्मण खानझोडे यांना त्यांच्या मोबाईलवर एक फोन आला. फोनवर बोलणाऱ्यांनी मुलाला बंगळुरू येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो, असं सांगितलं. परंतु, त्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी केली. खानझोडे यांनी दोन्ही आरोपींच्या नावावर रक्कम ट्रान्सफर केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दोन्ही भामट्यांनी रक्कम काढून घेत पळ काढला. अभिषेक रंजन आणि हरिष जैन असं या फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींची नावं आहेत.
आभिषेक रंजन आणि हरिश जैन नावाच्या या दोन भामट्यांनी दत्ता खानझोडे यांना फोन केले. त्या फोन क्रमांकांच्या सीरिज या पश्चिम बंगालमधील आहेत. शिक्षक असलेल्या खानझोडे आणि त्यांच्या पुत्राने संकेतस्थळावरून वैद्यकीय प्रवेशासाठी अभिषेक रंजन आणि हरिश जैन यांची माहिती घेतली. ती त्यांना विश्वासार्ह्य वाटली. त्यामुळे त्यांनी 10 लाख रुपये या दोन्ही भामट्यांच्या खात्यावर जमा केले. एक दिवसानंतर सदर वैद्यकीय महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर पाहणी केली असता, ते संकेतस्थळ उपलब्ध होत नसल्याचं खानझोडे यांच्या लक्षात आलं. तसेच या दोन्ही भामट्यांनी आपली फसवणूक झाल्याचे त्यांना समजले. खानझोडे यांनी तत्काळ पोलीस स्थानकात धाव घेतली.
सदर प्रकाराचा गुन्हा नोंदवत, पोलिसांनी तपास सुरु केला आहे. तसेच अशा कोणत्याही संकेतस्थळावर शहानिशा करुन खात्री केल्याशिवाय पैसे भरू नयेत आणि स्वत:ची फसवणूक करून घेऊ नका, असं आवाहन शिवाजीनगर पोलिसांनी नागरिकांना केलं आहे.