सोलापूर : आयपीएल मॅचेसवर अवैध पद्धतीने सट्टा चालवणाऱ्या काही जणांना सोलापूर शहर गुन्हे शाखेने काही दिवसांपूर्वी अटक केली होती. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सोलापूर शहर गुन्हे शाखेने नागपुरात जाऊन आणखी तीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. 6 नोव्हेंबर रोजी सोलापुरातील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आयपीएल सट्टा चालवत असल्याप्रकरणी ताब्यात घेतलं होतं. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील कलबुर्गी येथून 10 नोव्हेंबर रोजी आणखी दोघांना ताब्यात घेतलं. अटक केलेल्या या चार ही आरोपींच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार, या सट्टा प्रकरणाचे धागेदोरे नागपूर पर्यंत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली.


त्यानुसार सोलापूर शहर गुन्हे शाखेचे एक पथक मागील 4 दिवसांपासून नागपूरमध्ये थांबून होते. खबऱ्यांमार्फत आरोपीचा सुगावा लागताच वरीष्ठ अधिकाऱ्यांसह दुसरे पथक देखील नागपूरला रवाना झाले. नागपूर जिल्ह्यातील उमरेड रोडवरील एका फार्महाऊसवर पोलिसांना छापा टाकत सट्टा प्रकरणातील मुख्य संशयित बुकी रिंकु उर्फ अमित अग्रवाल, सुनील शर्मा, राहूल काळे या तिघा आरोपींना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून सट्ट्यासाठी वापरलेले लॅपटॉप, मोबाईल आणि इतर मुद्देमाल देखील पोलिसांना जप्त केल्याची माहिती आहे.


विशेष म्हणजे सोलापूर आणि कलबुर्गीतून ताब्यात घेतलेले आरोपी नागपुरातील मुख्य बुकी असलेल्या रिंकू अग्रवाल याच्याकडे सट्टा लावत होते. मात्र कोणत्याही आरोपीने रिंकू अग्रवालला पाहिले देखील नव्हते. केवळ विश्वासाच्या आधारे फोनद्वारे हा सगळा प्रकार सुरु होता. त्यामुळे आरोपींचा शोध घेणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र तांत्रिक बाबी आणि खबऱ्यांच्या माहितीमुळे पोलिसांना आरोपींना ताब्यात घेण्यात यश आलं आहे. काल आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांना उमरेडच्या न्यायलयात हजर करुन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर आरोपींना घेऊन सोलापूरकडे रवाना झाले आहेत. आज आरोपींची वैद्यकीय चाचणी करुन त्यांना न्यायलयात हजर केलं जाण्याची शक्यता आहे.


आयपीएलच्या मॅचेस संपल्या असल्यातरी नागपूरच्या उमरेड रोडवरील फार्महाऊसवर आरोपींचा सट्ट्याचा हिशोब सुरु होता. अशी माहिती पोलिस सुत्रांकडून देण्यात आली आहे. सोलापूर आणि कलबुर्गीतून अटक कऱण्यात आलेल्या 4 आरोपींकडून पोलिसांनी 38 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला होता. आता नागपुरातून ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून देखील लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. मागील जवळपास 12 दिवसांपासून सोलापूर शहर गुन्हे शाखेचे पथक विविध ठिकाणी छापा टाकत आहेत. त्यामुळे याप्रकरणात आणखी मोठे मासे अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक संजय साळुंखे, उपनिरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.


महत्त्वाच्या बातम्या :