शेतजमिनीच्या वादातून दोन सख्या भावांची निर्घृण हत्या; दुहेरी हत्याकांडाने ठाण्यात खळबळ
Thane Latest News Update : शेतजमिनीच्या वादातून दोन सख्या भावांची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Thane Latest News Update : शेतजमिनीच्या वादातून दोन सख्या भावांची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शहापूर तालुक्यातील सरलांबे गावात घडली आहे. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात दुहेरी हत्याकांडाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून सरलांबे गावातून एका हल्लेखोराला शहापुर पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केले आहे.सोमनाथ अधिकारी (रा. सरलांबे) असे दुहेरी हत्याकांडात अटक आरोपीचे नाव आहे. तर योगेश धर्मा अधिकारी ( वय ३०), आणि पुंडलिक धर्मा अधिकारी (वय ३५) असे निर्घृण हत्या झालेल्या दोघा सख्या भावांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार मृतक योगेश धर्मा अधिकारी व पुंडलिक धर्मा अधिकारी हे दोघे भाऊ ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील सरलांबे गावात कुटूंबासह राहत होते. त्यातच रविवारी रात्रीच्या सुमारास मृत दोघे भाऊ आणि आरोपी सोमनाथ अधिकारी हे तिघे आरोपी सोमनाथच्या शेतातील घरात दारू पीत बसले होते. दारूच्या नशेत असतानाच, त्याच सुमारास पूर्वीच्या शेतजमिनीच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला होता. मात्र हा वाद एवढा विकोपाला गेला कि, आरोपी सोमनाथ याने या दोघा भावांच्या डोक्यात व मानेवर धार धार शस्त्राचे घाव घालून त्यांना जागीच ठार निर्घृण हत्या करून घटनस्थळावरून पळ काढला होता.
दरम्यान आज सकाळच्या सुमारास घटनेची माहिती शहापूर पोलिसांना मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत दोघा भावांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शहापूर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात रवाना केले. दुहेरी हत्याकांच्या प्रकरणी मृतक भावांचे वडील धर्मा अधिकारी यांनी शहापुर पोलिसांत आज (सोमवारी ) गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला असता, काही तासातच आरोपी सोमनाथ अधिकारी याला पोलीस पथकाने सरलांबे गावातून अटक करण्यात आली आहे.
आता पोलीस आरोपी सोमनाथ सोबत आणखी कोणी गुन्हयात आरोपींचा सहभाग आहे का या दिशेने तपास सुरु केल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे यांनी दिली आहे. तसेच जमिनीच्या वादातूनच दुहेरी हत्याकांड झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेचा अधिक तपास शहापूर पोलीस करीत आहेत.























