Thane Crime: ठाण्यात कुख्यात गुंडाची दहशत, हत्याराऐवजी कारखाली चिरडून मारायचा नवा पॅटर्न, भयंकर सीसीटीव्ही फुटेज समोर
ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, आरोपी घटनेनंतर पसार झाला आहे. या प्रकारामुळे वागळे इस्टेट परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Thane Crime: ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात रविवारी रात्री उशिरा घडलेली थरारक घटना संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. कुख्यात गुंड संतोष पवार उर्फ संध्या याने पूर्व वैमनस्यातून थेट चारचाकी कारखाली चिरडून एका व्यक्तीचा खून केला. या घटनेचे भयंकर दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणामुळे परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पूर्व वैमनस्यातून थरारक खून
मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव विठ्ठल गायकर असे असून त्याचं संतोष पवार याच्याशी पूर्वीपासूनच वैमनस्य होतं. याच वादातून रविवारी रात्री सुमारे नऊच्या सुमारास वागळे इस्टेट परिसरात संतोष पवार याने आपल्या कारने थेट विठ्ठल गायकर याला धडक दिली आणि अक्षरशः चिरडून टाकले. या भीषण हल्ल्यात गायकर यांचा जागीच मृत्यू झाला.
आरोपी फरार, पोलिसांची तीन पथकं शोधात
घटनेनंतर आरोपी संतोष पवार कारसह फरार झाला. मात्र, श्रीनगर पोलिसांनी तत्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली असून आरोपीची कार जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीच्या जवळच्या एका साथीदाराला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. श्रीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुलजारीलाल फडतरे यांनी सांगितले की, आरोपीच्या शोधासाठी तीन विशेष पथके तयार करून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
परिसरात भीतीचे सावट
सीसीटीव्ही फुटेजमुळे या घटनेचं खरं स्वरूप समोर आलं असून स्थानिक नागरिक भयभीत झाले आहेत. गुन्हेगारी पद्धतीत गुंड आता हत्याराऐवजी वाहनाचा वापर करून खून करत असल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. वागळे इस्टेट परिसरातील रहिवाशांनी पोलिसांकडून कडक कारवाईची मागणी केली आहे. या थरारक घटनेनंतर ठाण्यातील गुन्हेगारी स्वरूप आणि त्यातील नवनवीन पॅटर्नकडे पुन्हा एकदा लक्ष वेधलं जात असून, पोलिसांना आरोपी लवकरात लवकर पकडण्याचं मोठं आव्हान आहे.
'खून का बदला खून'; आंदेकर टोळीकडून रेकी अन् ट्रॅप
पुण्यातील वनराज आंदेकरच्या हत्येला वर्ष पूर्ण होत असताना पोलीसांनी त्याच्या हत्येचा बदला घेण्याचा प्रयत्न हाणून पाडला आहे. ज्यामुळे पुण्यातील टोळी युद्धाचा भडका उडण्याची धोका सध्या तरी टळला आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या निर्घृण हत्येला वर्ष पूर्ण होताच, विरोधी टोळीने बदला घेण्यासाठी तयारी केली होती. वनराज आंदेकरच्या हत्येतील मुख्य आरोपी सोमनाथ गायकवाडच्या मुलावर कात्रज भागात रविवारी मध्यरात्री हल्ला करण्याचा कट आखण्यात आला होता. या कटात एकाला ताब्यात घेण्यात आल्याने कट उधळला गेला. या प्रकरणात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
























