Thane Crime News : पब्जी या जीवघेण्या खेळाचं भूत तरुणाईच्या मानगुटीवरून उतरण्याची चिन्ह काही दिसत नाहीत. केंद्र सरकारनं या गेमवर बंदी घातल्यानंतर हा गेम पुन्हा नव्या रुपात भारतात लॉन्च करण्यात आला. पब्जी बॅन केल्यामुळे निराश झालेली तरुणाई पुन्हा एकदा त्याच्या जाळ्यात अडकण्यास सुरुवात झाली. यापूर्वीही आपण या खेळावरुन अनेकांनी आपले जीव गमावल्याच्या घटना ऐकल्या आहेत. आता ठाण्यातही पब्जी गेमवरुन धक्कादायक घटना घडली आहे. खेळाच्या वादातून मित्रांनीच आपल्या मित्राची हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. 


पब्जी खेळाच्या वादातून वर्तकनगरात त्रिकुटानं मित्राची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. साईल जाधव असं मृत तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी ताब्यात घेतलेला आरोपी प्रणव कोळी याला न्यायालयानं 6 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 


ठाण्यातील वर्तकनगर येथील जानकादेवी मंदिर परिसरात असलेल्या जुनी पाईपलाईनजवळ आरोपी प्रणव कोळी आणि दोन्ही अल्पवयीन मुलं राहतात. त्याच भागात राहणाऱ्या मृत साईलसोबत या तिघांचा पब्जी खेळात एकमेकांना हरवण्यावरून काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंतही गेलं होतं. मात्र त्यावेळी त्यांना समज देऊन सोडून देण्यात आलं होतं. अखेर दोन दिवसांपूर्वी रात्री जानकादेवी मंदिर परिसरात प्रणव आणि इतर दोन अल्पवयीन मुलांचा साईलसोबत पुन्हा वाद झाला. यावेळी या तिघांनी चाकू, सुरे, तलवारींनी भोसकून साईलची निर्घृण हत्या केली. या प्रकारानं वर्तकनगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 


दरम्यान, साईलच्या आईनं दिलेल्या तक्रारीवरून वर्तकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर मुख्य आरोपी प्रणव याला अटकही करण्यात आली आहे. तसेच अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतल्याची माहिती वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम यांनी दिली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha