Satara News : माढा लोकसभा मतदारसंघाचे (Madha Loksabha) खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) यांनी कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार त्यांच्याच कार्यकर्त्यांने सातारा जिल्हा पोलीस प्रमुखांकडे दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारावर आर्थिक गुन्हे शाखेत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि तक्रारदार या दोघांचेही जबाब नोंदवण्यात आले आहेत. या आरोपांमुळे मात्र माढा मतदार संघात आणि त्यांच्या होमपिचवर म्हणजेच फलटणमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. दिगंबर आगवणे यांनी ही तक्रार केली आहे. या प्रकरणी केवळ तक्रार दाखल करण्यात आली असून अद्याप कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाही.


दिगंबर आगवणे यांनी गेल्या पंचवार्षिकला भाजपच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढवली. याच आगवणे यांनी सातारा जिल्हा पोलिस प्रमुखांना भेटून माढा मतदारसंघाचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात तक्रारी अर्ज दाखल केलाय. आगवणे यांनी आरोप केलाय की, फलटण शहरातील विविध जमिनींवर काढलेल्या कर्जातील तब्बल 4 कोटींपेक्षा जास्त रक्कम खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या खात्यात जमा केली आहे. त्यांनी बँकेच्या सर्व देवाणघेवाणीचे उतारे या तक्रारीबरोबर जोडले आहेत. एवढंच नाही तर दिगंबर आगवणे यांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावावरील साखरवाडी येथील जमीन गहाण ठेवून 226 कोटी रुपयांचे कर्ज काढून दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.


तक्रारदार दिगंबर आगवणे आहे तरी कोण?


दिगंबर आगवणे हे गिरवी तालुका फलटण येथील राहणारा असून त्याने विधानसभा निवडणुकीत दोन वेळा काँग्रेस आणि एक वेळा भाजप असे तीन वेळा आपलं नशिब आजमावण्याचा प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकीच्या काळात खांद्याला खांदा लावून दिगंबर आगवणे यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे  काम केले.आगवणे हे खासदारांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयात दिगंबर आगवणे यांचाही वाटा असल्याचे स्टेजवरुन खुद्द खासदारांनी सांगितले होते. आणि अचानक दिगंबर आगवणे यांनी केलेल्या तक्रारीमुळे संपूर्ण माढा मतदार संघ आणि फलटण मतदार संघात खळबळ उडाली आहे. या कर्जप्रकरणामुळे मी रस्त्यावर आल्याचे दिगंबर आगवणे सांगत असून त्यांनी आता न्याय न मिळाल्यास मी आत्महत्या करणार असल्याचही तक्रारीत नमूद केलंय. एवढंच नाही तर माझ्या जिवातालाही धोका असल्याचा उल्लेख त्याने तक्रारी अर्जात केला आहे.  


आरोप खोटे असल्याचं रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं स्पष्टीकरण


या खळबळजनक आरोपानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन या झालेल्या सर्व प्रकाराबाबत स्पष्टीकरण देताना दिगंबर आगवणे यांनी केलेले आरोप खोटे असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. शिवाय या कर्ज प्रकरणाला इतरही प्रॉपर्टी मॉर्गेज केली असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तक्रारीनंतर खासदारांनी याबाबत पोलिसांना आपले म्हणणे सादर केले आहे.  जिल्हा पोलीस प्रमुख अजय बंसल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सध्या या प्रकरणाची  चौकशी सुरू असल्याचे सांगून कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिला आहे.