(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मौजमजेसाठी दुचाक्या, मोबाईल चोरायचे; चार जणांना अटक, 16 गुन्हे उघडकीस
Crime News Update : दुचाक्या आणि मोबाईल पळवणाऱ्या सराईत चार गुन्हेगारांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे.
Thane, Bhiwandi Latest Crime News Update : दुचाक्या आणि मोबाईल पळवणाऱ्या सराईत चार गुन्हेगारांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. मौजमजेसाठी आरोपी मोबाईल आणि दुचाक्या चोरत असल्याचं समोर आले आहे. शांतीनगर पोलिसांनी या आरोपींना शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत. अटक केल्यानंतर या सराईत गुन्हेगारांची पोलिसांनी कसून चौकशी केली. या आरोपींकडून आतापर्यत 16 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच आतापर्यंत आठ लाखांच्यावर मुद्देमाल हस्तगत कऱण्यात आल्याची माहिती भिवंडीचे पोलीस उपआयुक्त योगेश चव्हाण यांनी दिली आहे. सुनील उर्फ सोन्या शंकर फुलारे (वय 20 रा.लहुजीनगर,कल्याण) आयाज अली रेहमतअली अन्सारी (वय 38 रा.चिरागनगर घाटकोपर) ,दाऊद शोएब अन्सारी (वय 28 रा गुलजार नगर, भिवंडी) , सर्फराज रेहमतअली खान (वय 26 रा.भिवंडी) असे बेड्या ठोकलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.
भिवंडी शहरात वाहन चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असतानाच, शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतुनही मोठ्या संख्येने दुचाक्या व मोबाईल पळविण्याच्या घटना घडत होत्या. या घटना रोखण्यासाठी शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची वेगवेगळी पथके नेमली. वाहन चोरी, मोबाईल चोरी व चैन स्नाचिंग च्या दाखल गुन्ह्यांचा तपास करीत असताना या पथकाने सुनील उर्फ सोन्या शंकर फुलारे, आयाज अली रेहमतअली अन्सारी, दाऊद शोएब अन्सारी, सर्फराज रेहमतअली खान या चार जणांना विविध ठिकाणावरून सापळा रचत बेड्या ठोकल्या आहेत.
अटक गुन्हेगारांकडून आतापर्यत 11 दुचाकी , 1 रिक्षा, दोन सोन्याच्या चैन व 23 चोरीचे मोबाईल असा एकूण 8 लाख 17 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या चौकडीने शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 13, शहर पोलीस ठाण्यातील 2, नारपोली पोलीस ठाण्यातील 1 अशा एकूण 16 चोरीच्या गुन्ह्याची उकल केली आहे. विशेष म्हणजे चोरीचे हे सर्व मोबाईल नेपाळ या ठिकाणी विक्रीसाठी पाठविले जात असताना जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. शांतीनगर पोलीस पुढील तपास करत आहेत.