वसईत कंपनीच्या गुंडाची दहशत, पालिकेच्या गाडीची तोडफोड, वाहनचालकालाही मारहाण
वसई विरारामध्ये अनधिकृत बांधकामाच पेवच फुटलं आहे. अधिकाऱ्यांना हाताशी धरुन, बेफाम बांधकामे उभी राहत आहेत. आता हे भूमाफिया मस्तवाल झाले आहेत. त्यामुळे त्यांना आता कायद्याचही भय उरलं नाही.

वसई : वालीव येथील इन्टरटेक टेक्नॉलॉजी या कंपनीच्या कर्मचारी आणि मालकाने सहाय्यक पालिका आयुक्त आणि कर्मचाऱ्यावर हल्ला केला आहे. यात वाहनचालकाच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली आहे. तर पालिकेच्या जेसीबीचीही तोडफोड करण्यात आली आहे. अंतर्गत रस्त्यावर कंपनीने अनधिकृत बांधकाम उभारले होते. ते तोडण्यास पालिकेचं पथक आज दुपारी गेलं असता, हा हल्ला झाला. वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना सीसीटीव्ही आणि मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
वसईच्या वालीव येथील अॅपल स्टुडिओच्या समोरील इन्टरटेक टेक्नॉलॉजी प्रायवेट लिमिटेड कंपनीने अंतर्गत रस्त्यावर अनधिकृत बांधकाम उभारलं होतं. पालिकेनं याआधीही हे बांधकाम पाडलं होतं. मात्र, या कंपनीने पुन्हा हे बांधकाम उभारलं. आणि हेच अवैद्य बांधकाम पाडण्यासाठी आज दुपारी पावणे तीनच्या सुमारास पालिकेचे सहाय्यक उपायुक्त राजेंद्र कदम हे आपल्या कर्मचाऱ्यासह स्वतः बांधकाम तोडण्यासाठी उपस्थित होते. मात्र, कंपनीतील मालकाने आणि त्याच्या कर्मचाऱ्यांनी लोखंडी रॉडने जेसीबी आणि जेसीबीच्या चालकावर हल्ला केला. तसेच सहाय्यक उपायुक्त आणि कर्मचाऱ्ंयावर दगडफेक करुन, त्यांना तेथून पिटाळून लावलं. जेसीबीच्या काचा फोडल्या, जेसीबीचा चालक रमजान अली अब्दुल खान यालाही मारहाण केली. खान याच्या डोक्यावर मार लागला असून, त्याला चार टाकेही पडले आहेत. सहाय्यक उपायुक्तांनी याबाबत वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
वालीव पोलिसांनी याप्रकरणी सरकारी मालमत्तेचं नुकसान, सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला सारखे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी सहा जणांना ताब्यात घेतलं आहे. वसई विरारामध्ये अनधिकृत बांधकामाचं पेवच फुटलं आहे. अधिकाऱ्यांना हाताशी धरुन, बेफाम बांधकामे उभी राहत आहेत. आता हे भूमाफिया मस्तवाल झाले आहेत. त्यामुळे त्यांना आता कायद्याचही भय उरलं नाही.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
