माळशिरसमध्ये तरण्याबांड लेकाला हाल हाल करुन संपवलं; पीडित आईची आर्त हाक, आरोपींनाही तशीच शिक्षा द्या
आकाश अंकुश खुर्द हा पिलीव येथे आपली विधवा आई पत्नी आणि सात महिन्याच्या मुलासह राहत होता. मंगळवारी त्याला कोणाचा तरी फोन आला आणि तो घराबाहेर पडला.

सोलापूर : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडांचे फोटो पाहून महाराष्ट्र हादरुन गेला होता. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी करत आणि आरोपींच्या लवकरात लवकर फाशीची मागणी केली जात आहे. सोलापूर जिल्ह्यातही अशीच हादरवरुन टाकणारी घटना घडली. पिलीव माळशिरस (Malshiras) रस्त्यावरील फॉरेस्टचे निर्मनुष्य जंगलात एका तरुणाचा अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या ठिकाणी एका तरुणाचा हाल हाल झालेला मृतदेह आढळून आला असून नग्न मृतदेहावर क्रूर मारहाणीचे आणि गरम सळईने चटके दिल्याचे निशाण दिसून आले. अशा क्रूर पद्धतीने एका तरुणाचा मृतदेह सापडल्याने सोलापूर जिल्हा हादरून गेला आहे. आता, माझ्या लेकाच्या मारेकऱ्यांना शोधून फाशी द्या, त्यांनाही तसेच हालहाल करुन शिक्षा द्या, अशी आर्त हाक पीडित आईने माध्यमांसमोर बोलताना दिली आहे. दरम्यान, पोलीस (Police) घटनेचा शोध घेत आहेत.
आकाश अंकुश खुर्द हा पिलीव येथे आपली विधवा आई पत्नी आणि सात महिन्याच्या मुलासह राहत होता. मंगळवारी त्याला कोणाचा तरी फोन आला आणि तो घराबाहेर पडला. मात्र, पहाटे त्याची क्रूर हत्या करून त्याचा मृतदेह या फॉरेस्टमध्ये टाकण्यात आला होता. मृतदेहाशेजारीच त्याची दुचाकी खाली पडलेल्या अवस्थेत होती, त्याच्या नग्न मृतदेहाशेजारी पडलेल्या त्याच्या कपड्यातून महत्त्वाचा पुरावा असणारा मोबाईल गायब झाला होता. सकाळी ग्रामस्थांना ही घटना कळल्यावर गावात खबर पसरली आणि लोकांनी घटनास्थळी धाव घेतली.
आरोपींना तशीच शिक्षा द्या
आपल्या मुलाची हत्या झाल्याची माहिती सकाळी पीडित कुटुंबाला कळल्यावर घरात एकच आक्रोश सुरू झाला. आकाशचा मृतदेह इतक्या भयानक अवस्थेत सापडल्याने कुटुंबीय देखील हादरुन गेले होते. दरम्यान, पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून अद्याप अहवाल सादर झालेला नाही. मात्र, या संपूर्ण प्रकारावर पोलिसांनी बोलणे टाळत माध्यमांची भेटही टाळली आहे. या घटनेत मृत आकाशचा मोबाईल हा महत्त्वाचा पुरावा ठरणार असून यावर आलेले फोन कोणाचे होते, यावरून त्याच्या हत्येचा छडा लागू शकणार आहे. पण, त्याचा मोबाइलही गायब आहे. आकाशच्या हत्येमुळे केवळ 7 महिन्याचा मुलगा, विधवा पत्नी आणि विधवा आई आता उघड्यावर पडले आहेत. घरातून गेलेल्या माझ्या मुलाचा थेट मृतदेहच घरात आला, माझ्या लेकास मारहाण करणाऱ्यांना देखील तसंच हाल हाल करुन शिक्षा द्या, अशी मागणी पीडित आईने केली आहे. दरम्यान, या क्रूर हत्येमागे नेमके कोण आहे हे शोधणे पोलिसांसाठी आव्हानात्मक असणार आहे. बीड, परभणीतील हत्याकांडाच्या घटना ताज्या असतानाच आता सोलापूर जिल्ह्यातही अशा क्रूर रीतीने मारहाण आणि चटके देऊन हत्या झाल्याने सोलापूर जिल्हा देखील हादरून गेला आहे.
हेही वाचा
Video : माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही; जयंत पाटलांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या























