Pune: देशात महिला अत्याचार आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्काराचं सत्र थांबायला तयार नाही. देशातील विविध कोपऱ्यातून दररोज हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. अशातच पुण्यातील (Pune) कोंढवा (Kondhwa) परिसरातून सर्वांना हादरून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. या परिसरातील एका 35 वर्षाच्या व्यक्तीनं दहा वर्षाच्या मुलीला खेळण्याचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केले. ही घटना काल (2 फेब्रुवारी) दुपारी घडलीय. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. 


मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी मंगळवारी दुपारी तिच्या घराबाहेर खेळत होती. त्यावेळी आरोपीनं पीडिताला पत्ते खेळण्याचे आमिष दाखवून तिला घरात बोलावले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केले. आपल्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार आरोपीनं तिच्या आईला सांगितला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईनं पोलिस ठाणे गाठत आरोपीविरुद्ध तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने बलात्कार आणि पोक्सओचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केलीय. या प्रकरणी कोंढवा पोलीस अधिक तपास करत आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी ऐकमेकांच्या घराजवळच राहतात. आरोपी हा रिक्षाचालक असून त्याच्या आईसोबत कोंढवा परिसरात राहतो. आरोपीची पत्नी त्याला सोडून गेली आहे. मात्र, मंगळवारी आरोपीनं दहा वर्षाच्या मुलीसोबत धक्कादायक कृत्य केल्यानं परिसरात एकच खळबळ माजली आहे. महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासनाकडून कठोर पावली उचलली जात आहेत. मात्र, तरीही महिला अत्याचाराच्या घटना सुरुच आहेत.


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha