BMC Budget 2022 : मुंबई महापालिकेचं बजेट आज ऑनलाईन सादर होणार आहे. त्यामुळं आगामी महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला काय गिफ्ट मिळणार याकडे मुंबईकरांचं लक्ष लागलं आहे. मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक लक्षात घेऊन कोणतीही नवी करवाढ किंवा शुल्कवाढ न करण्याकडे सत्ताधारी शिवसेनेचा कल असणार आहे. तसंच मुंबईकर मतदारांना खूश करण्यासाठी मोठ्या प्रकल्पांचीही घोषणा होणार असल्याचं समजतं. खड्डेमुक्त रस्ते, सक्षम आरोग्य यंत्रणा, पूरमुक्त मुंबई यासाठी यंदाच्या अर्थसंकल्प तरतूद केली जाणार असल्याचं कळतंय.
निवडणुकीच्या तोंडावर आज आशियातील सर्वात मोठ्या आणि श्रीमंत महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आजही मुंबई महापालिकेचे ऑनलाईन बजेट सादर होणार आहे. यंदाच्या वर्षात महापालिकेच्या अर्थसंकल्पात 3 हजार कोटींपर्यंतची वाढ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आशियातील सर्वात मोठ्या आणि श्रीमंत महापालिकेचं बजेट काय असणार? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या बजेटमध्ये मुंबईकरांसाठी काय असणार? करवाढ, शुल्कवाढ होणार का? मुंबईत कोणत्या प्रकल्पांवर सत्ताधाऱ्यांचा कल असेल? याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अर्थसंकल्पातून मुंबईकरांना काय मिळणार?
कोस्टल रोड प्रकल्पावर वाढीव तरतुद
12 हजार कोटी रुपयांची तरतूद याआधीच्या अर्थसंकल्प करण्यात आली आहे. मात्र पुढील दोन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करणं अपेक्षित असल्यानं अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात येणार आहे.
खाऱ्या पाण्याचं गोडं पाणी करण्याचा प्रकल्प
समुद्राचं पाणी गोडं करण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतला असून यासाठी मोठी तरतूद करण्यात येणार आहे.
आरोग्य यंत्रणेवर मोठी तरतुद
दवाखान्यांच्या संख्येत वाढ करण्यात येणार असून मोठ्या रुग्णालयांचा विस्तार करण्यात येणार आहे.
बेस्टला किती अनुदान
बेस्ट उपक्रम तोट्यात असून बेस्टची गेल्या तीन वर्षांची तूट भरून काढण्यासाठी पालिकेने बेस्टला 6650.48 कोटी रुपये दिले. त्यामुळे बेस्टचा थोडासा भार हलका झाला आहे. तरीही बेस्ट ची अद्याप तीन हजार कोटींची तूट शिल्लक आहे. पालिकेने 2020-21 मध्ये बेस्टसाठी 1500 कोटींची तरतूद केली होती. यावर्षी बेस्टसाठी महापालिका काय तरतुद करते याकडे लक्ष लागलं आहे.
काही विशेष प्रकल्प/योजनांवरही तरतुद
- विविध विषाणुंचा अभ्यास करण्यासाठी विशेष रुग्णालयं
- पालिकेच्या दवाखान्यांची संख्या वाढवणार, दवाखाने संध्याकाळच्या वेळेतही सुरूच राहणार
- नद्यांचं सौंदर्यीकरण, मिठी नदीमध्ये बोटिंग सुरु करणार
- सीबीएसई (CBSE), आयसीएसई (ICSE) बोर्डाच्या नव्या शाळा
- कचऱ्याची विल्हेवाट प्रकल्प, कचर्यापासून वीज प्रकल्प करणार
- पर्यटनाला चालना देण्यासाठी योजना, पर्यावण संवर्धन उपक्रम
- उत्पन्न वाढीसाठी नवीन स्तोत्र निर्माण करणं
- पुलांच्या मजबुतीसाठी, नवीन पुलांसाठी विशेष निधी, सीसीटीव्ही कॅमेरे
महापालिकेच्या गेल्या दोन वर्षांतील अर्थसंकल्प कसा होता?
पालिकेचा 2020-2021 मध्ये बजेट मांडताना 33441.02 कोटींचा अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. मात्र गेल्या वर्षी 2021-22 च्या बजेटमध्ये नव्या प्रकल्पांसह मोठ्या विकास योजनांसाठी तब्बल 16.74 टक्केची वाढ करून 39 हजार 038 कोटींचा मेगा बजेट सादर करण्यात आलं होते. तर यंदाच्या अर्थसंकल्पात आणखी वाढ होऊन पालिकेचा अर्थसंकल्प 41 हजार कोटींचा मांडला जाण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी पाहा फक्त एबीपी माझा लाईव्ह