मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्ज सप्लायर फारूक बटाटाचा मुलगा शाहदाबला बेड्या, एनसीबीची कारवाई
शाहदाब बटाटा हा मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्स सप्लायर फारुख बटाटाचा मुलगा आहे. शाहदाब ड्रग्सच्या कामात जास्त प्रमाणात सक्रिय होता.
मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) काल मुंबईमध्ये तीन ठिकाणी छापेमारी करत दोन कोटींपेक्षा अधिक ड्रग्ज जप्त केल्या आहेत. या कारवाईमध्ये मुंबई मधील सगळ्यात मोठा ड्रग्स सप्लायर असलेल्या फारूक बटाटाचा मुलगा शहादाब बटाटाला अटक केली आहे. तर दोन कोटींपेक्षा अधिकचे ड्रग्स सुद्धा जप्त केले आहेत.
मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडे गेल्या अनेक दिवसांपासून शाहदाब बटाटा मोठ्या प्रमाणात ड्रग्जच्या व्यवसायात सक्रिय असल्याची माहिती मिळाली होती. मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी एक पथक नेमलं आणि स्वतःच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यास सज्ज झाले.यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून एनसीबीने शादाबवर नजर ठेवली होती. शाहदाब कोणाला भेटतो, त्याचा माल कुठून येतो, तो कोणाला पुरवतो या सगळ्याची माहिती गोळा करण्याचं काम एनसीबीकडून सुरू होतं.
दरम्यान एनसीबीला माहिती मिळाली की, काल मुंबईमधील तीन वेगवेगळ्या ठिकाणी ड्रग्जचा सप्लाय मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्या हिशोबाने एनसीबीने सापळा रचला आणि वर्सोवा, लोखंडवाला, मीरा रोड या तिन्ही ठिकाणी धाड करत 2 कोटींपेक्षा अधिकचे एमडी ड्रग्स जप्त केले. या सोबतच काही महागड्या गाड्या, रोख रक्कम आणि पैसे मोजण्याची मशीनही एनसीबीने जप्त केली आहे.
शादाब बटाटा हा मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्ज सप्लायर फारुख बटाटाचा मुलगा आहे. शादाब ड्रग्सच्या कामात जास्त प्रमाणात सक्रिय होता. ड्रग्ज संदर्भातील बड्या डिलींग शाहदाब स्वतःच करायचा शादाबचे कॉन्टॅक्ट मोठ्या लोकांसोबत होते तर काही बड्या सेलिब्रेटीसोबत सुद्धा शाहदाबच उठणं बसणं होतं.