(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangli Crime : आटपाडी तहसीलदाराच्या शासकीय वाहनावर डम्पर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न
आटपाडीच्या तहसीलदाराच्या गाडीवर डम्पर घालून त्यांना आणि गाडीतील महसूलच्या अन्य कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. चालकाच्या प्रसंगावधानाने गाडीतील कर्मचारी सुखरुप आहेत.
सांगली : तहसीलदारांच्या शासकीय वाहनावर डम्पर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना सांगलीतील आटपाडी तालुक्यात घडली आहे. आटपाडी-मुढेवाडी रोडवर तहसीलदार बाई माने या वाळूची कारवाई करण्यासाठी जात होत्या. त्यांच्या गाडीवर डम्पर घालून त्यांना आणि गाडीतील महसूलच्या अन्य कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. चालकाच्या प्रसंगावधानाने तहसीलदार आणि गाडीतील महसूल पथकाचे कर्मचारी सुखरुप आहेत.
डम्परच्या धडकेनंतर गाडीचे दरवाजे डम्परमध्येच सापडल्याने तहसीलदार काही काळ मोटारीतच अडकून पडल्या होत्या. जो डम्पर गाडीवर घातला त्यामध्ये खडी होती, अशी माहिती तहसीलदार माने यांनी दिली. या प्रकारानंतर डम्पर मालकावर शासकीय कामात अडथळा आणि जीवे मारण्याचा प्रयत्न या गुन्ह्याखाली अटक केली आहे. यामध्ये तहसीलदार बाई माने यांच्या शासकीय गाडीचे मोठे नुकसान देखील झाले आहे.
तहसीलदार माने रात्री अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी पथकासह गेल्या होत्या. यावेळी आबानगर चौकात गस्त घालत असताना एक डम्पर भरधाव वेगाने येत असल्याचे समजलं. पथकाने त्याचा पाठलाग केला. अचानक डम्परने चकवा दिला. त्याच ठिकाणी थोड्यावेळ गस्त घालत असताना मुढेवाडीकडून भरधाव डम्पर आला आणि तहसीलदाराच्या गाडीवर घातला.
जळगावात रेती माफियांची मुजोरी कायम
जळगाव जिल्ह्यात रेती माफियांची मुजोरी काही केल्या कमी होत नसल्याचं पाहायला मिळत आहे. तलाठ्याने अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडल्यानंतर त्याला धक्काबुक्की करत हा ट्रॅक्टर रेती मफियांनी पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव शहरातील खोटे नगर महामार्गावर घडला आहे. या घटनेसंदर्भात तालुका पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर मालक आनंद इंगळेसह चालक यांच्याविरोधात अवैध रेती वाहतूक केल्याप्रकरणी आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुलढाण्यात रेती तस्करांचा महसूल भरारी पथकावर हल्ला, तहसीलदारांची गाडी फोडली
बुलढाणा जिल्ह्यात अवैध रेती तस्करांची वाढती मुजोरी पाहायला मिळाली. अवैध रेती तस्करांची गाडी अडवली म्हणून चक्क इनोव्हा कारने महसूल विभागाच्या गाडीचा पाठलाग करुन गाडी आडवी लावून चक्क तहसीलदारांची गाडी फोडून वाहन चालकाला ही बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना शेगाव तालुक्यातील कठोरा गावाजवळ घडली. अवैध वाळू तस्करांना आळा बसावा म्हणून शेगाव महसूल विभागाने एक भरारी पथक नेमलं आहे. काल (14 मार्च) सायंकाळी दोन मंडळ अधिकारी आणि वाहन चालकासह शेगाव तालुक्यातील कठोरा शिवारातील पूर्णा नदीपात्रातील अवैध रेती तस्करी करणाऱ्या वाहनाला हटकले असता त्याने या अधिकाऱ्यांना आधी शिवीगाळ केली. इतकंच काय हे पथक आपल्या वाहनाने परत निघाले असता चार ते पाच जणांनी इनोव्हा गाडीतून पथकाचा पाठलाग केला. रस्त्यात इनोव्हा आडवी लावून या पथकावर दगडफेक करुन हल्ला केला. यात तहसीलदारांची शासकीय वाहनाची काच फोडण्यात आली. तर दगडफेक होत असताना गाडीतील दोन मंडळ अधिकारी बाजूला पळून गेल्याने बचावले. हल्ला करणाऱ्या रेती तस्करांनी शासकीय गाडीच्या वाहन चालकाला मारहाण करून तेथून पोबारा केला. त्यामुळे जिल्ह्यात रेती तस्करांची मुजोरी वाढल्याचं दिसत आहे. जलंब पोलिसांनी चार ते पाच हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आज सकाळी तीन हल्लेखोरांना अटक केली असून अजूनही दोन जण इनोव्हा घेऊन फरार आहेत, जलंब पोलीस निरीक्षक धीरज बंडे यांनी ही माहिती दिली.
बीडमध्ये वाळू वाहतुकीविरोधात कारवाईला जाणाऱ्या गाडीचा अपघात, मंडळ अधिकारी जागीच ठार, तर तहसीलदार जखमी
याआधी बीडमध्ये अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाईसाठी जात असताना पथकातील एका गाडीचा अपघात झाला. यामध्ये नायब तहसीलदार जागीच ठार झाले, तर तहसीलदार गंभीर जखमी झाले. ही घटना गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन रोडवरील सावळेश्वर फाट्यावर 6 मार्च रोजी घडली होती. नितीन जाधव असे अपघातात मृत्यू झालेल्या मंडळ अधिकाऱ्याचे नाव आहे. तर बीडचे प्रभारी तहसीलदार डोके हे अपघातात जखमी झाले होते.