Pimpari : 'माझ्यासोबत संबंध ठेव, तुझे करिअर बनवतो'; 16 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, पिंपरीतील क्रिएटिव्ह अकॅडमीच्या संचालकाचा प्रताप
Pimpari Chinchwad Crime : या प्रकरणात पिंपरीतील क्रिएटिव्ह अकॅडमीचा संचालक आणि त्याला साथ देणाऱ्या एका तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : तुझे करिअर बनवतो, तू माझ्यासोबत रिलेशनमध्ये रहा' असं म्हणत क्रिएटिव्ह अकॅडमीच्या (Creative Academy Pimpari Chinchwad) नौशाद शेख याने दहावीतील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. हा धक्कादायक प्रकार पिंपरी- चिंचवड शहरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी क्रिएटिव्ह अकॅडमीचा संचालक नौशाद अहमद शेख (वय 58) याच्यासह एका तरुणीला अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी 16 वर्षीय पीडित मुलीच्या वडिलांनी तक्रार दिली. आरोपी नौशाद शेख हा पिंपरी- चिंचवडमध्ये क्रिएटिव्ह अकॅडमी या नावाखाली निवासी शाळा चालवतो. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून मुले आरोपीच्या निवासी शाळेत येतात. आरोपी ठिकठिकाणी जाऊन सेमिनारद्वारे मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करतो. दरम्यान, सन 2021 मध्ये शेख याने यवतमाळ मध्ये जाऊन अशाच प्रकारे सेमिनार घेतला होता. त्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी तिचा नववी इयत्तेमध्ये निवासी शाळेत 2 लाख 26 हजार रुपये भरून प्रवेश घेतला होता.
घरच्यांना खोटं सांगेन अशी धमकी दिली
दरम्यान, सन 2022 मध्ये आरोपीने तो राहत असलेल्या फ्लॅटमध्ये पीडित मुलीला बोलावून घेतले. तेथे तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुलीने प्रतिकार करत स्वतःची सुटका केली. त्यानंतर आरोपी मुलीला जाणीवपूर्वक त्रास देऊ लागला. तुझ्या घरच्यांना फोन करून तुझे येथील मुलांबरोबर संबंध असल्याचे सांगेन असं सांगत तो धमकावू लागला.
नोव्हेंबर 2022 मध्ये देखील दिवाळीच्या सुट्टीमध्ये आरोपी शेख याने पीडित मुलीला तुला उटणे लावून अंघोळ घालून देतो, असं म्हणत तिचा विनयभंग केला. तसेच पुन्हा अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आरोपीने इतर मुलींसमोर पीडित मुलीबाबत अश्लील शेरेबाजी केली. त्यानंतर मुलीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दुसऱ्या आरोपी तरुणीने पीडित मुलीला शेख याच्याबरोबर संबंध प्रस्थापित करण्यासाठी दबाव आणल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दोन वर्षे अत्याचार सहन केला
पीडित मुलीने सुमारे दोन वर्ष अत्याचार सहन केला. दोन वर्ष अत्याचार सहन केल्यानंतर मला यापुढे येथे शिकायचे नाही, मला घरी घेऊन चला, असे पीडित मुलीने पालकांना सांगितले. त्यानुसार पालकांनी मुलीला गावाकडे नेले. गावी गेल्यानंतरही मुलीने झालेल्या प्रकाराबाबत कोणालाही सांगितले नाही. ऑगस्ट 2023 ते जानेवारी 2024 कालावधीमध्ये मुलगी घरात कोणाशी बोलत नव्हती, कायम गप्प राहत होती.
दरम्यान, मुलीने क्रिएटिव्ह अकॅडमीच्या काही माजी विद्यार्थिनींशी मोबाईलद्वारे संपर्क केला. त्यावेळी एका माजी विद्यार्थिनींनी, मी देखील अशाच काही प्रकारांना सामोरे गेली आहे. मात्र, त्यावेळेस मी हे कुणाला सांगितले नाही. तू तुझ्या आई-वडिलांना हा सर्व प्रकार सांग, जेणेकरून तुला न्याय मिळेल, त्यामुळे यापुढे अन्य कुठल्याही मुलीबरोबर असे घडणार नाही" असा सल्ला दिला.
त्यानुसार, 11 जानेवारी 2024 रोजी मुलीने रडत रडत तिच्यासोबत घडलेल्या सर्व प्रकारची माहिती आई वडिलांना दिली. याबाबत माहिती मिळताच कुटुंब मोठ्या तणावात होते. या धक्क्यातून सावरल्यानंतर पालक मुलीला घेऊन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात आले. पोलिसांनी देखील घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आरोपींना बेड्या ठोकल्या.
ही बातमी वाचा: