Parbhani Crime News : गावातील गावगुंडांकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून पती पत्नीनं गळफास घेतला. यात पतीचा मृत्यू झाला तर दोरी तुटल्यानं पत्नी बचावली आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची मृत्यूशी झुंज सुरु आहे. पतीनं ठेवलेल्या व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये म्हटलं आहे की, गावातील 5 गावगुंडांकडून सतत मला आणि पत्नीला जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. पत्नीला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी ब्लॅकमेल केलं जातं असल्याने आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवून पती पत्नीने गळफास घेतला. यात पतीचा मृत्यू झाला असून पत्नी मृत्यूशी झुंज देत आहे. ही धक्कादायक घटना परभणीच्या गंगाखेड तालुक्यात घडली आहे.
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. 14 एप्रिल रोजी मध्यरात्री सदर पतीनं असं व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवल्याची बाब पहाटे काही ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने त्यांनी त्यांच्या भावाला उठवले आणि त्यांनी घरात प्रवेश केला असता त्यांना भयानक दृश्य नजरेस पडले.
गळफास घेतल्याने पतीचा मृत्यू झाला होता तर त्यांच्या पत्नीनं गळफास घेतल्यानंतर दोरी तुटल्याने त्या अत्यवस्थ होत्या. त्यांना तात्काळ परभणीच्या सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे.
या प्रकरणात मृत्यू झालेल्या पतीनं गळफास घेण्याआधी व्हॉट्सअॅप स्टेटसला काही मजकूर ठेवला होता. ज्यात 5 जणांची नावं आहे. या पाच लोकांकडून त्यांना आणि त्यांच्या पत्नीला ब्लॅकमेल केले जात असल्याचे त्यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या