Beed: कायदा व सुव्यवस्थेवरून बीडमधील राजकीय नेत्यांमध्ये बरेच वाद-प्रतिवाद पाहायला मिळाले, मात्र बीडच्या पोलिसांनी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर जाऊन एका फसवणूक झालेल्या व्यापाराचे चाळीस लाख रुपये परत आणून देण्याचं काम केल्याने बीड पोलिसांचं सध्या सर्वत्र कौतुक केले जात आहे


बीड जिल्ह्यातील परळी शहरच्या पोलिसांनी पाकिस्तान बॉर्डरवर जाऊन मोठी कारवाई केली आहे. एक वर्षापूर्वी परळी शहरातील एका व्यापाऱ्यास कमी दरात सोने देतो म्हणून दोन आरोपींनी त्यांची चाळीस लाखांची फसवणूक केली होती. या दोन आरोपींना परळी शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ व डीबी शाखेचे भास्कर केंद्रे गुजरातमधील भुज-कच्छ या ठिकाणच्या जंगलात जाऊन अटक केली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील व्यापारी शंकर शहाणे यांना गुजरात मधील भुज कच्छ या ठिकाणी राहत असलेला जीसूप मोहम्मद अली कक्कळ आणि सिकंदर ह्या दोघांनी स्वस्तात सोने देतो म्हणून पाच लाखांचे सोने दिले. यावर शंकर शहाणे यांचा विश्वास बसला. व्यवहार करतेवेळी जीसूप कक्कळ याने आपले नाव बदलून अब्बास अली, अशा नावाचा वापर केला होता. नंतर जिसुप कक्कळने आणखी स्वस्तात सोने देतो म्हणून शंकर शहाणे यांच्याकडून नगदी रोख चाळीस लाख घेऊन गेला. 40 लाख घेऊन गेल्यानंतर जवळपास सहा महिने जीसुप हा शंकर शहाणे यांना सोने न देता आज देतो, उद्या देतो म्हणून वेळ काढत राहिला. कोरोनाचा काळ आहे म्हणून टोलवाटोलवी करीत राहिला. जिसुप कक्कळ व सिकंदर आपली फसवणूक करीत आहे, हे लक्षात येताच शंकर शहाणे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शहाणे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलीस जिसुप कक्कळ आणि सिकंदर यांच्या मागावर होती. 


भार्गव सपकाळ आणि भास्कर केंद्रे यांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपी जीसूप कक्कळ हा भुज कच्छ पासून 17 किलोमीटर अंतरावरील रतिया या ठिकाणच्या फार्महाऊसमध्ये राहतो अशी माहिती मिळाली. रतियापासून पाकिस्तानची सीमा केवळ 70 किलोमीटर अंतरावर आहे. आरोपीस पोलीस आहेत हे समजू नये, म्हणून भास्कर केंद्रे यांनी रूप बदलत एका मतीमंद व्यक्तीचे रूप धारण केले. त्यांनी मदतीसाठी स्थानिकचे चार पोलिस कर्मचारी सोबत घेऊन आरोपीचे फॉर्म हाऊस गाठले. स्थानिक पोलिसांना आरोपीच्या बंगल्याच्या समोरचा दरवाजा वाजवण्यास सांगितले. आरोपी मागच्या बाजूने जंगलात पळून जाणार ऐवढ्यात भार्गव सपकाळ व भास्कर केंद्रे यांनी आरोपीस पिस्तुलाचा धाक दाखवत पकडले. सोबतच दुसरा आरोपी सिकंदर यासही अटक केली. आरोपीकडून मुद्देमाल रोख 40 लाख रुपयांसह ताब्यात घेत परळीत आणले. आरोपींस अटक करून मुद्देमाल जप्त केल्याबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ, गुप्त शाखेचे भास्कर केंद्रे, गोविंद भताने, श्रीकांत राठोड यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.