इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये सुटकेसमध्ये सापडलेल्या मृतदेहाप्रकरणी पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. या हत्येचं महाराष्ट्र कनेक्शन आहे. हत्येप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. यामध्ये मृताची पत्नी, मुलगी आणि जावयाला अटक केली आहे. हे तिघेही मुंबईजवळच्या कल्याणमध्ये राहतात. या हत्या प्रकरणात मृताची पत्नी मुख्य सूत्रधार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. तिने स्वतःच्या पतीची हत्या केली आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सुमारे 600 किमी प्रवास करुन तो इंदूरला आणला. त्यानंतर निर्जन शेतात पेट्रोल टाकून मृतदेह जाळला. पोलिसांनी इंदूर ते मुंबई सीसीटीव्ही फुटेज तपासले असता या प्रकरणाचा उलगडा झाला आणि तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या.


इंदूरच्या राजेंद्रनगर पोलीस स्टेशन परिसरात रविवारी (10 एप्रिल) सकाळी पोलिसांनी निहालपूर मुंडी इथल्या एका शेतात ट्रॉली बॅगमध्ये अर्धवट जळालेला मृतदेह सापडला होता. या संपूर्ण प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी कल्याण इथल्या 60 वर्षीय राजकुमारी मिश्रा आणि तिचा जावई उमेश शुक्ला, मुलगी नम्रता शुक्ला यांना ताब्यात घेतलं. त्यांची चौकशी केली असता हा मृतदेह राजकुमारी मिश्रा यांचे पती संपतलाल मिश्रा यांचा असल्याचं निष्पन्न झालं. सखोल चौकशीत महिलेने आपल्या पतीचा खून केल्याचं सांगितलं. गुन्हा केल्यानंतर राजकुमारी मिश्राने पतीचा मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये भरला. पतीचा मृतदेह जावई उमेशच्या गाडीच्या डिक्कीत घालून इंदूरला घेऊन आली आणि निर्जन जागा पाहून तो पेटवून दिला.


मुख्य आरोपी असलेल्या महिलेचा जावई उमेश हा मुंबईतील एका नामांकित मोबाईल कंपनीत काम करतो. चेकपोस्टवर पोलिसांनी गाडी तपासू नये म्हणून त्यांनी मुलांनाही गाडीत बसवलं होतं. पोलिसांनी टोलनाके, हॉटेल आणि ढाब्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता घटनास्थळाच्या आजूबाजूला देखील तीच कार दिसली. पोलिसांनी सर्व सीसीटीव्ही फूटेजच्या कड्या जोडल्या आणि इंदूर पोलीस उमेशपर्यंत पोहोचले. इंदूरमध्ये त्याचे लोकेशन सापडले असता तो घटनास्थळी उपस्थित असल्याची पुष्टी झाली.


बुधवारी पोलिसांनी त्याला ताब्यात घेताच प्राथमिक चौकशीत त्याने कबुली दिली. पोलिसांनी राजकुमारीला ताब्यात घेतले तेव्हा तिने सांगितले की पती संपतलाल मिश्रा याच्याशी तिचा वाद होत होता. शनिवारी (9 एप्रिल) झालेल्या बाचाबाचीनंतर तिने त्याला ढकलले असता तो डोक्यावर पडला. बेशुद्ध पडल्यावर त्याला रुग्णालयात नेण्याऐवजी बॅगेत भरला. संपूर्ण घटना मुलगी नम्रता हिला सांगितली. तिघांनी मिळून मृतदेह कारमध्ये ठेवला आणि इंदूरला नेऊन जाळला. सध्या हत्येमधील तिन्ही आरोपी तुरुंगात आहेत.