BJP leader Kirit somaiya Press Conference Today : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्याशी संबंधित कंपन्यांवर मनी लाँड्रिंगचे आरोप लावल्यानंतर, भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आज नवीन बॉम्ब फोडणार आहे. ठाकरे कुटुंबाशी संबंधित आणखी एका कंपनीचा घोटाळा बाहेर काढण्याचा इशारा काल (गुरुवारी) पत्रकार परिषदेत बोलताना किरीट सोमय्यांनी दिला आहे. आज दुपारी एक वाजता किरीट सोमय्यांची पत्रकार परिषद होणार आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी डर्टी डझन मंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना लक्ष्य करणारे किरीट सोमय्या आज कोणता गौप्यस्फोट करणार, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.  


महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) नवा घोटाळा उघडकीस आणणार असल्याचा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना दिला. तसेच, मी नॉट रिचेबल का झालो होतो? याचंही उत्तर आज देणार असल्याचं सोमय्या म्हणाले आहेत. संजय राऊतांनी (Sanjay Raut) विक्रांत फाईल्स (INS Vikrant) उघडल्यानंतर याप्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या (Neil Somaiya) यांच्यावर ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. तेव्हापासून किरीट सोमय्या आणि नील सोमय्या नॉट रिचेबल होते. संजय राऊतांनीही वारंवार सोमय्या फरार असल्याचा दावा ट्विटरवरुन केला होता. अशातच मुंबई उच्च न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केल्यानंतर किरीट सोमय्या पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. काल (गुरुवारी) पत्रकार परिषद घेत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. याच पत्रकार परिषदेत बोलताना सोमय्यांनी आज ठाकरे सरकारचा नवा घोटाळा उघडकीस आणणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. 


काय म्हणाले होते किरीट सोमय्या? 


भाजप खासदार किरीट सोमय्या म्हणाले होते की, "मुंबई महाराष्ट्राचा अभिमान आहे. त्यामुळे मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा प्रश्नच येत नाही. मुंबई केंद्रशासित होणार नाही, ही स्टंटबाजी करुन संजय राऊत उद्धव ठाकरेंच्या म्हणण्यावरुन घोटाळ्यांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. " पुढे बोलताना उद्धव साहेब तुमच्या कुटुंबाचा आणखी एक घोटाळा जनतेसमोर उघडकीस आणणार आहे, असा इशारा सोमय्यांनी दिला होता. तसेच, घोटाळेबाजांकडील पैसा पुन्हा जनतेच्या तिजोरीत जमा करणं हा माझा धर्म आहे, कर्तव्य आहे, असंह ते म्हणाले होते. 


"ठाकरे सरकारमधील एक डझजन लोकांची प्रॉपर्टी अटॅच झाली आहे. अनिल देशमुख, श्रीधर पाटणकर, नवाब मलिक, संजय राऊत, यशवंत जाधव, अजित पवार, हसन मुश्रीफ, सदानंद कदम, अनंतराव अडसूळ आणि इतरांची संपत्ती अटॅच झाली आहे. नियमांप्रमाणे मी किंवा वकील जाऊ शकतात. आम्ही कोर्टात सगळी माहीती देत आहोत, 1997-98 पासून विक्रांतची मोहीम सुरू झाली. विक्रांतचा कार्यक्रम सिंबॉलिक होता. विक्रांत वाचवण्यासाठी सेनेनं समर्थन दिलं होतं. 1997 सालापासून सुरुवात केली आहे.  संजय राऊतांनी ऊद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून माझ्यावर आरोप केले आहेत. रात्री एक वाजता माझ्यावर गुन्हा दाखल झाला, याला सेटींग म्हणतात.", असं किरीट सोमय्या म्हणाले होते. 


दरम्यान, आयएनएस विक्रांत प्रकरणी पैशांचा अपहार केल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊतांकडून केला जात आहे. तसेच, यातील मुख्य सूत्रधार किरीट सोमय्या असल्याचा दावाही संजय राऊतांकडून केला जात आहे. याप्रकरणी माजी सैनिक बबन भोसले यांनी ट्रॉम्बे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर नवी मुंबईतही याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल केला. याच प्रकरणात चौकशीसाठी सोमय्या पिता-पुत्रांना समन्सही बजावण्यात आलं होतं. त्यानंतर सोमय्या पिता-पुत्रांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, दोघांचाही अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयानं फेटाळला होता. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी मुंबई सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मुंबई उच्च न्यायालयानं किरीट सोमय्यांना दिलासा देत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. तसेच सलग चार दिवस चौकशीला उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :